
लोहगड किल्ला परिसरात रविवारपर्यंत जमावबंदी
लोणावळा, ता. ५ : लोहगड किल्ल्यावरील हाजी हजरत उमरशावाली बाबा यांच्या उरुसाला होणाऱ्या शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर लोहगड आणि घेरेवाडी परिसरात मावळच्या प्रांताधिकारी व पोलिस प्रशासनाच्या वतीने रविवारपर्यंत (ता. ८)जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
लोहगड किल्ला हे एक ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ आहे. हे ठिकाण २६ मे १९०९ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले असून, भारतीय पुरातत्त्व विभागाचे आधिपत्याखाली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत लोहगड किल्यावरील हाजी हजरत उमरशावाली बाबा यांचा संदल उरुस भरत आहे. या उरुसास शिवप्रेमी व हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध आहे. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व विभागाकडून या ठिकाणी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आलेली होती. पोलिसांच्या वतीनेही याठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रांताधिकारी मावळ यांच्याकडून रविवारपर्यंत (ता. ८) संचारबंदीचे आदेश बुधवारी उशिरा देण्यात आले. संचारबंदी दरम्यान आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्याचे संकेत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिले आहेत.
काय आहे आदेश
- कोणत्याही समाजमाध्यमाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरविणारे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाही किंवा फॉरवर्ड करणार नाही, असे केल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती तसेच ग्रुप अॅडमिनची राहील
- लोहगड व घेरेवाडी हद्दीमधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलिस विभागाच्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील
- या परिसरामध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी जमा होऊ नये
- समाज भावना भडकवतील अशा घोषणा, भाषण करू नये
- या परिसरामध्ये मोर्चा/आंदोलन करण्यात येऊ नये
- प्रतिबंधात्मक कालावधी दरम्यान धार्मिक विधींसाठी पशू-पक्षांचा बळी दिला जाऊ नये
- या परिसरामधील ऐतिहासिक व सार्वजनिक वस्तूंचे नुकसान करण्यात येऊ नये.