
महाशिवरात्रीनिमित्त नागफणेश्वर दर्शनास भाविकांची गर्दी
लोणावळा, ता. १८ : येथील पंचक्रोशीतील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रायवूड येथील सिद्धेश्वरासह कुरवंडे गावाजवळील नागफणी सुळक्याच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या नागफणेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठ्या संख्येने गर्दी केली होती. रायवूड येथे महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले होते. यंदा महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. शनिवारी पहाटे विश्वस्तांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. लघुरुद्र पठण, महाआरती, पूजा करत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागफणेश्वर येथे महादेवाच्या पिंडीस फुलांची आरास करण्यात आली होती. उढेवाडी येथे राजमाची किल्ल्याच्या परिसरात दुर्गम ठिकाणी वसलेल्या प्राचीन गोधनेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्रीपासून पायपीट करत महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले. ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्ला येथे भाविकांच्या रांगा
कार्ला येथे ऐतिहासिक तळ्याकाठी वसलेल्या महादेवाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. येथील शिवशंकर तरुण मंडळाच्या वतीने हरीजागर, महाअभिषेक, फराळ वाटप करत कार्ला येथील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी सैनिक सुभेदार कैलास येवले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिवशंकर मंदिर येथे विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळाच्या वतीने सामुदायिक आरती घेण्यात आली.