विशेष मुलांची कार्यकुशलता वाढविण्याची गरज

विशेष मुलांची कार्यकुशलता वाढविण्याची गरज

लोणावळा, ता. १ : ‘‘बौद्धिकदृष्ट्या विकलांग समजल्या जाणाऱ्या मुलामुलींमध्ये अनेक बाबतीत सामान्यांच्या तुलनेत सरस कौशल्यगुण आहेत. त्यांच्यातील कुशलतेला वाव मिळवून दिल्यास व्यावहारिक जगात त्यांचे जगणे सुकर होईल,’’ असे मत लोणावळा येथे झालेल्या तीन दिवसीय दहाव्या राष्ट्रीय बौद्धिक विकलांग परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केले. विशेष मुलांमध्ये एकाग्रता, उत्सुकता आणि निरागसता अशा मुलामुलींमध्ये सामान्यांपेक्षा जास्त असल्याने त्यांच्यातील कार्यकुशलतेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचा निष्कर्ष यावेळी व्यक्त करण्यात आला.
अनाम-प्रेम परिवार आणि सुमती ग्राम ह्यूमन राईटस् प्रोटेक्शन फोरमतर्फे लोणावळा येथे बौद्धिकदृष्ट्या विकलांग तसेच विशेष ‘साद-प्रतिसाद’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या शाळांमधील दीडशेहून अधिक मुलामुलींनी सहभाग घेतला. अनाम प्रेम परिवाराचे सतीश नगरे, हेलन केलर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश देसाई, शिक्षण संचालक अनुराधा बागची, उपप्राचार्य प्रिया गोन्सालवीस, चित्रपट निर्माता दिग्दर्शक नितीन पानसे, लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, माजी उपनगराध्यक्ष धीरूभाई कल्याणजी, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज, वरसोलीचे सरपंच संजय खांडेभराड, नितीन वाडेकर आदी उपस्थित होते. स्मरणशक्ती स्पर्धा, दुकानदारी व्यवहार स्पर्धा, निरीक्षण अनुभव कथन स्पर्धा घेण्यात आल्या. आयत्या वेळेस विषय देवून त्यांच्यातील कलागुणांची केलेली पारख समाधानकारक असल्याचे मुख्य संयोजक तन्वी ठाकूर यांनी सांगितले. ‘कलाविष्कार’ कार्यक्रमात बालकलाकारांनी नृत्य, संगीत, नाटकांच्या केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळविली.


गीतसंगीतातून मतिमंदत्वावरील उपचार आशादायक

समारोप समारंभात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरी वादक पं. केशव गिंडे आणि सतार वादक विदुषी जया जोग यांनी सांगितिक मैफलीत विशेष मुले-मुली मंत्रमुग्ध झाली. दरम्यान, सौरभ नगरे यांनी रूद्रवीणा वादन केले. अनाम-प्रेम संस्थेतर्फे अशा मुलामुलींवर गीतसंगीतातून मतिमंदत्वावर उपचार करण्याचे प्रयोग आशादायक ठरत असल्याचे अनाम प्रेम परिवाराचे तसेच सुमती ग्राम ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे आशुतोष ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, तबलावादक मनोज कदम यांचा सत्कार हिमा नगरे, अंजली ठाकूर आदि पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास अनाम प्रेम परिवाराचे लोणावळा येथील संतोष पाळेकर, सारिका पाळेकर, अरुण माळी, नितीन पानसे, अंजली ठाकूर, शीतल सावंत, नूतन देशपांडे, अनुप सामंत व मातीकाम कौशल्य विकास चे किरण त्रिलोकी आदींचे सहकार्य लाभले.


छायाचित्र: LON23B02387

लोणावळा: येथे आयोजित ''साद-प्रतिसाद'' या कार्यक्रमात कलाविष्कार सादर करताना विशेष मुले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com