
खंडाळा तलाव, कामशेत इंद्रायणी नदीची स्वच्छता
लोणावळा, ता. १ : संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवीवर्षानिमित्त ‘अमृत परियोजने’अंतर्गत ‘स्वच्छ जल-स्वच्छ मन’ अभियानास सुरुवात करण्यात आली. या अभियानामध्ये खंडाळ्यातील ऐतिहासिक तलाव, कामशेत येथील इंद्रायणी नदी घाट परिसरात शेकडो स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबविले.
पाण्यात पडलेला प्लास्टिक कचरा, सेंद्रिय कचरा, निरुपयोगी पदार्थ, अनावश्यक झुडपे, खराब अन्नपदार्थ, जलपर्णी तसेच जलाशयांमध्ये आढळून येणारे शेवाळ स्वच्छ करण्यात येत नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यात आला. संत निरंकारी मिशनचे पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदांनी यांनी या परियोजनेविषयी माहिती देताना सांगितले की, सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या आशीर्वादाने ही योजना संपूर्ण देशभरातील २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये जवळपास ११०० हून अधिक ठिकाणी राबविण्यात आली. ‘अमृत परियोजने’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा, कऱ्हा, घोडनदी, पवना, कुकडी, मीना, वेळू अशा सर्व नद्यांवरील विविध घाट, त्याचबरोबर खडकवासला धरण, नाझरे धरण, कात्रज तलाव, पाषाण तलाव आदी ४१ ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करून ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमात समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीर, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह यांची स्वच्छता केली. पथनाट्याद्वारे पाण्याचे महत्त्व, संरक्षण , पाण्यातून होणारे विकार यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती निर्माण जल संरक्षणाची प्रेरणा दिली.
छायाचित्र: lON23B02390/02391