आडोशी ते खंडाळा दरम्यान ‘ब्लॉक’

आडोशी ते खंडाळा दरम्यान ‘ब्लॉक’

लोणावळा, ता. ५ : शाळा-महाविद्यालयांना लागलेल्या सुट्या आणि वीकेंडला जोडून आलेली बुद्ध पौर्णिमेची सुटी यामुळे पर्यटनासाठी निघालेल्या वाहनांमुळे बोरघाटात वाहनांची मोठी कोंडी झाली. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शुक्रवार (ता. ५) पासून आडोशी ते खंडाळा बोगद्यादरम्यान दहा-दहा मिनिटांचा ब्लॉक सुरू आहे.
खालापूर आणि उर्से टोल प्लाझा येथे ‘गोल्डन अवर्स’ची मात्रा लागू करीत या दरम्यान डबल एक्सल, तीन-एक्सल आणि मल्टी-एक्सल वाहने थांबविण्यात येत आहेत. सध्या सुट्यांचा हंगाम सुरू झाल्याने द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बोरघाटात वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ‘पिक अवर्स’दरम्यान पुण्याकडे येणारे अवजड ट्रक, कंटेनर, मल्टी-अॅक्सल वाहने खालापूर टोलनाक्यावर थांबविण्यात येणार आहेत.

पुण्याकडे येणाऱ्यांची संख्या प्रचंड
शुक्रवारी सकाळपासून बोरघाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र होते मुंबई-पुणे मार्गिकेवर वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने खोपोली एक्झिट ते खंडाळा बोगदा (किलोमीटर क्र.३९ ते ४५/५००) दरम्यान वाहतूक संथगतीने सुरू आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आडोशी बोगदा ते खंडाळा बोगद्यादरम्यान दहा-दहा मिनिटांचा ब्लॉक घेऊन पुणे वाहिनीवरील वाहने मुंबई लेन थांबवून त्यामार्गावरून विरुद्ध दिशेने काढून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मात्र, कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांना वाहनांची वाढलेल्या संख्येमुळे झालेली कोंडी आणि वाहतूक नियंत्रणासाठी घेण्यात आलेला ब्लॉक वाहतूक कोंडीचा दुहेरी फटका बसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

‘‘द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलिस आयआरबी, डेल्टा फोर्स, रस्ते विकास महामंडळ प्रयत्न करीत आहेत. पोलिसांकडून योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला आहे. वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत कोंडीत वाहने पुढे घेऊन जाऊ नये व लेनची शिस्त पाळत यंत्रणांना सहकार्य करावे.’’
- महेश चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक, बोरघाट पोलिस मदत केंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com