
रेल्वेच्या धडकेत अज्ञात तरुणीचा मृत्यू
लोणावळा, ता. २६ ः लोणावळा ते मळवली रेल्वे स्थानकांदरम्यान बोरज गावच्या हद्दीत रेल्वेच्या धडकेत अज्ञात तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २६) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मृत तरुणीचे वय अंदाजे २० असून उंची पाच फूट आहे. अंगाने सडपातळ, रंगाने गोरी, चेहरा उभट, कपाळ मोठे, नाक सरळ, डोक्याचे केस काळे लांब वाढलेले असे मृताचे वर्णन आहे. मृत तरुणीच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ इंग्रजी ‘पी’ अक्षर गोंदलेले व मनगटावर तीन ताऱ्यांचा टॅटू काढण्यात आला आहे. मृताच्या अंगात काळे-पिवळे चौकटीचा व त्यावर इंग्रजीत अॅटीट्यूड लिहिलेला फूल बाह्याचा शर्ट व फेरारी लिहिलेली काळ्या रंगाची ट्रॅकपॅंट परिधान केली आहे. मृत तरुणीचा रेल्वेच्या धडकेत किंवा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला असावा, अशी शक्यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून मृताविषयी माहिती असल्यास लोणावळा रेल्वे दूरक्षेत्र पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.