
पीएमपीएमएल व एसटी बसथांब्यावर शेड कधी मोशी परिसरातील नागरिकांचा सवाल
मोशी, ता. १३ : आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर पोचलेल्या मोशीतील पीएमपीएमएल व एसटी प्रवाशांना साधे निवारा शेड नसावे, अशी खंत मोशीतील नागरिक व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर ते मिळणार कधी, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
येथील शेकडो प्रवासी दररोज चाकण, खेड, मंचर, नारायणगाव ते अगदी नाशिकपर्यंत एसटीने तर मंचरपर्यंत पीएमपीएमएल बसने प्रवास करतात. मात्र, गेल्या पंचवीस वर्षांत एकदाही या ठिकाणी निवारा शेड उभारण्यात आलेले नाही. पीएमपीएमएल व एसटी बससाठी येथे एकच थांबा असल्याने आणखी किती दिवस तळपत्या उन्हात आणि धो-धो पावसात बसची वाट पाहात थांबावे लागणार, असा संतप्त प्रश्न येथील प्रवाशांनी विचारला आहे.
पंचवीस वर्षांपूर्वी मोशीचा महापालिकेत समावेश झाला. नागरीकरण वाढून गावाचा झपाट्याने विकास झाला. येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात हेलिकॉप्टरही उतरविण्याची व्यवस्था असणार आहे. मात्र, दुसरीकडे याच उपनगरातील पीएमपीएमएल व एसटी थांब्यांवर नागरिकांना शेडविना तळपत्या उन्हात बसची वाट पाहात थांबावे लागत आहे.
कोरोनाकाळात व एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपात गेले अनेक महिने एसटी बंद होती. आता ती पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने प्रवासी मोठी गर्दी करत आहेत. त्यातच आता या महामार्गावरील अतिक्रमणही हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता मोशीकरांना पीएमपीएमएल व एसटी बसथांब्यांवर शेड मिळण्यास काहीच हरकत नसल्याचे किसन शिंदे, रामदास कडवे, बाजीराव गवारे या प्रवाशांनी सांगितले.
थांब्यांवर शेड नसल्याने तळपत्या माझ्यासारख्या अनेक ज्येष्ठांना उन्हात थांबावे लागत आहे. तसेच बसायलाही जागा नसल्याने काही प्रवाशांना जमिनीवरच बसावे लागते.
- हिरामण मदगे, प्रवासी
Web Title: Todays Latest Marathi News Mos22b00701 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..