स्पाईन रस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पाईन रस्त्याची दुरवस्था
स्पाईन रस्त्याची दुरवस्था

स्पाईन रस्त्याची दुरवस्था

sakal_logo
By

मोशी, ता. १३ : विविध ठिकाणी पडलेले खड्डेच खड्डे, तुटलेले लोखंडी संरक्षक कठडे, पडलेले दिशादर्शक फलक, अस्ताव्यस्त वाढलेली झाडे, चौकातील तुटलेले वर्तुळाकार रस्ता दुभाजक आदी समस्यांमुळे एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या पुणे-नाशिक महामार्ग ते पुणे-मुंबई महारार्गादरम्यान असलेल्या स्पाईन रस्त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे.
पडलेले हे खड्डे बुजवणे, तुटलेले लोखंडी कठडे दुरुस्त करणे, पडलेले दिशादर्शक फलक पूर्ववत करणे यासारखी दुरुस्तीची कामे करून पुन्हा एकदा शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या स्पाईन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक नागरिकांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने मोशी, चिखली, जाधववाडी या परिसराचा प्राधिकरणाच्या माध्यमातून अत्यंत सुंदर असा विकास करण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने पुणे-नाशिक महामार्गावरील राजा शिवछत्रपती चौक ते पुणे मुंबई महामार्गावरील भक्ती शक्ती चौक यादरम्यान हा स्पाईन रस्ता तयार करण्यात आला आहे. सॅटेलाइट व्हयूद्वारे हा रस्ता ‘मणक्याच्या आकाराचा’ दिसतो म्हणून या रस्त्याला ‘स्पाईन रस्ता’ असे नाव दिलेले आहे.
या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे पाच ते बारा मजली गृहनिर्माण संस्थांच्या सुंदर अशा इमारती ही उभारण्यात आलेल्या आहेत. या इमारतींमधील स्थानिक नागरिकांच्या वहिवाटीसाठी सुंदर असा सेवा रस्तेसुद्धा करण्यात आला आहेत. प्रमुख स्पाइन रस्ता ते सेवा रस्ता या दोन्हींच्या मधून लोखंडी रस्ता दुभाजक उभारण्यात आलेले आहेत. त्याबरोबरच राजा शिवछत्रपती चौकापासून पुढे संत गजानन चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, टाटा मोटर्स चौक आदी विविध चौकांमध्ये वाहन चालकांनी वर्तुळाकार वळसा घालून जावे यासाठी वर्तुळकार बेटे उभारण्यात आलेली आहेत.
मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर सध्या अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, लोखंडी रस्ता दुभाजक अनेक वेळा वाहनांनी दिलेल्या धडकांमुळे तुटून पडलेले आहेत. काही ठिकाणी पदपथांवरील पेविंग ब्लॉक निघालेले आहेत तर काही चौकांमधील वर्तुळाकार बेटांचे दगडही निघालेले आहेत. महापालिकेच्या वतीने या रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या वृक्षारोपणामधून वाढलेली झाडे अस्ताव्यस्त वाढलेली आहेत. अशा विविध समस्यांनी सध्या स्पाइन रस्त्याला ग्रासले आहे. सध्या निर्माण झालेल्या या विविध समस्यांनी स्पाईन रस्त्याच्या सौंदर्याला गालबोट लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी स्पाइन रस्त्यावर निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण करत पुन्हा एकदा या स्पाइन रस्त्याला शहराच्या सौंदर्यात वाढ करावी, अशी मागणी विक्रम दाते, सुरेंद्र सिंग, नरेश बागलानी, दीपक अहिरे, कामिनी भाटिया, सुरेश पाटील, केतन रंधवे आदी पादचारी तसेच स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mos22b00757 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..