मोशीतील राजा शिवछत्रपती चौकाची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोशीतील राजा शिवछत्रपती चौकाची दुरवस्था
मोशीतील राजा शिवछत्रपती चौकाची दुरवस्था

मोशीतील राजा शिवछत्रपती चौकाची दुरवस्था

sakal_logo
By

मोशी, ता. ३१ : राजा शिवछत्रपती चौकाची ओळख सांगणाऱ्या या नामफलकावरच लावलेले फ्लेक्स, चौकामध्ये सर्वत्र लावलेले जाहिरात फलक, पदपथांवर ठेवलेले जुने फ्रिज, टाकाऊ वस्तू आणि नो पार्किंग असा नामफलक असलेल्या पदपथासमोर लावलेल्या दुचाकी या सर्व समस्यांमुळे मोशीतील राजा शिवछत्रपती चौक ते संतनगर दरम्यान असलेल्या सेवा रस्त्यावरून स्थानिक पादचारी नागरिकांना ये-जा करणे सध्या अवघड झाले आहे. त्यामुळे या चौकामध्ये अनधिकृतपणे लावलेले फलक, ठेवलेल्या वस्तू आणि लावलेल्या दुचाकी धारकांवर कारवाई करण्याची मागणी पादचारी नागरिकांमधून होत आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने पुणे-नाशिक महामार्ग ते पुणे-मुंबई महामार्ग या दरम्यान प्रशस्त असा स्पाइन रस्ता तयार करण्यात आलेला आहे. या रस्ता व पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या राजा शिवछत्रपती चौकाची सध्या मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. चौकाची ओळख म्हणून असलेला राजा शिवछत्रपती चौक हा नामफलकच अन्य जाहिरातदारांनी लावलेल्या फ्लेक्समुळे झाकून गेलेला आहे. या चौकापासून संतनगरकडे जाणाऱ्या दोन्ही सेवा रस्त्यांवर अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानांमधील जुने फ्रिज, लाकडी व लोखंडी अन्य वस्तू ठेवल्या आहेत तर पदपथासमोर खेड, मंचर, आळेफाटा या ठिकाणी विविध कारणांसाठी ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांनी नो पार्किंगच्या जागेतच आपल्या दुचाकी लावल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पादचारी नागरिक रवींद्र बोरचटे, किशोर देवकर, अलका पठारे आदी नागरिकांकडून होत आहे.