ज्योतिबानगर लघुउद्योग परिसरात 
अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

ज्योतिबानगर लघुउद्योग परिसरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

Published on

निगडी, ता. २ : ज्योतिबानगर (तळवडे) लघुउद्योग परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्वरित दुरुस्तीची मागणी लघुउद्योजक तसेच स्थानिक नागरिकांनी केली आहे.
तळवडे (ज्योतिबानगर) परिसरात मोठ्या प्रमाणात लघुउद्योग आहेत. मात्र, या संपूर्ण औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अनेक रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाही. काही भागांत सांडपाणी वाहिनी फुटल्याने पाणी रस्त्यावर वाहत असून, वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे. सांडपाण्यामुळे आणि तुटलेल्या चेंबरमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
या मार्गावरून रोज मोठ्या संख्येने कामगार दुचाकी व पायी प्रवास करतात. खड्डे, पाणी आणि असमतोल रस्त्यांमुळे त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट होते. परिसरातील रस्ते अत्यंत अरुंद असून, त्यावरून अवजड वाहने, टेम्पो, ट्रक जाताना लघुउद्योगांना तसेच स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरात सर्व रस्ते डांबरीकरण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी लघुउद्योजक व स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
उद्योजक कीर्ती शहा म्हणाले, ‘‘ज्योतिबानगर परिसरात मोठी औद्योगिक वसाहत विकसित होत आहे. पण पायाभूत सुविधांचा गंभीर अभाव आहे. अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, ड्रेनेज आणि चेंबर दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे. वाहतुकीतील अडथळ्यांमुळे वेळेवर ऑर्डर पूर्ण करण्यात वाहतुकीचा अडथळा ठरत आहे.’’
कामगार योगेश दामेकर म्हणाले, ‘‘ज्योतिबानगर भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. रोज कंपनीत जाताना-येताना जीव वाचवत प्रवास करावा लागतो. खड्डे, पाणी, तुटलेले चेंबर यांमुळे मोठी कसरत होते. रस्ते आणि सुविधा सुधारणे गरजेचे आहे.’’

PNE25V72872
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com