वडगावच्या हर्षदाचे सुवर्णमय वेटलिफ्टिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावच्या हर्षदाचे सुवर्णमय वेटलिफ्टिंग
वडगावच्या हर्षदाचे सुवर्णमय वेटलिफ्टिंग

वडगावच्या हर्षदाचे सुवर्णमय वेटलिफ्टिंग

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे, ता. ३ ः आई शिवणकाम करते. वडील पाटबंधारे खात्यात नोकरीला. दोघेही दहावी शिकलेले. प्रतिकूल परिस्थितीच्या झळा दोघांनी सोसल्या. त्यामुळे अर्ध्यावर त्यांचे शिक्षण सुटले. क्षमता असून खेळावर पाणी सोडावे लागले. पण लेकीने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. नातीच्या या यशाने आजीलाही आकाश ठेंगणे झाले.
लेकीच्या यशाचे कौतुक आणि अभिनंदनाच्या वर्षावात वडगाव मावळचे गरूड कुटुंबीय न्हाऊन निघाले. ग्रीस येथील जागतिक पातळीवरील ज्युनिअर वेटलिप्टिंग स्पर्धेत हर्षदा शरद गरूड हिने सुवर्णपदक पटकावले. वेटलिप्टिंग क्षेत्राला आनंदाचे बहरते आले. वेटलिप्टिंगची पंढरी म्हणून गणली जाणाऱ्या वडगावकरांनी आनंदोत्सव केला.
हर्षदाच्या आजोबांनी सत्तरच्या दशकात नोकरीसाठी टाकवे खुर्द सोडले अन् वडगाव गाठले. दहा रुपये भाडे भरून सासुरवाडीत राहणारे हर्षदाचे आजोबा शांताराम आणि आजी ताराबाई. मुलांचे शिक्षण आणि संगोपन करताना गावाशी व शेतीशी त्यांनी नाळ तशीच जपली. पन्नास किलो तांदळाची पिशवी सहज उचलल्यावर हर्षदाला वेटलिप्टिंगसाठी दुबेज गुरुकुलमध्ये दाखल केले. आणि तिच्या वेटलिप्टिंगचा श्रीगणेशा सुरू झाला. हा तिच्या आयुष्यातील ट्रनिंग पाँईट ठरला. तिचे वडील शरद यांना जीमची आवड. आई रेखा कर्जत तालुक्यातील चिंचोची वाडी या खेड्यातील. गावात दहावी शिकलेली ती पहिली मुलगी. उंच उडी आणि कबड्डीत प्राविण्य असलेल्या तिच्या आईने कर्जत येथील माध्यमिक विद्यालयात शिकून उंच उडी स्पर्धेत राज्य पातळीवर मजल मारली. अर्ध्यावर शाळा सुटल्याने खेळातील आवड सुटली. पण, लेकीला प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले.
गुरुकुलचे सर्वेसर्वा बिहारीलाल दुबे यांचे मार्गदर्शन लाभले. वयाच्या तेराव्या वर्षापासून तिने वेटलिप्टिंगचा सराव केला. लेकीच्या खुराकाला दूध हवे म्हणून बापाने दोन म्हशी संभाळल्या. आईने गावरान अंडी खायला द्यायची म्हणून कोंबड्या पाळल्या. घरचा सकस आहार घेत जीम मध्ये वर्कआऊट करणारी हर्षदा आई-वडिलांच्या स्वप्नांसाठी वजन उचलत आहे. इंद्रायणी महाविद्यालयाच्या कला शाखेत शिकते. तिच्या यशात आजोबा सुभाष चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. हर्षदाच्या पूर्वी आपापल्या खेळात प्राविण्य असलेल्या व पदके पटकावणाऱ्या हर्षदा दुबे जोशी, मुक्ता गराडे, वैशाली खामकर या मावळ कन्यांच्या पावलावर पडलेले तिचे पाऊल मावळकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले.

जागतिक पातळीवरील स्पर्धा युट्यूबवर पाहताना क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती. हर्षदाच्या प्रत्येक मूव्हमेंटवर लक्ष होते. ती विजेते पद मिळवले असा आत्मविश्वास येत होता.
- रेखा गरूड, हर्षदाची आई

देशाला पदके हवी आहेत. यासाठी ग्रामीण भागातील खेळाडू हेरायला हवेत. त्यांना प्रवाहात आणून घडवावे, हा कानमंत्र डॉ. मधुसूदन झंवर यांनी दिला होता. तो मंत्र जपतोय.
- बिहारीलाल दुबे, प्रशिक्षक

उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा!
ग्रीस-हेरकिलॉन येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पुणे जिल्ह्यातील मावळची हर्षदा गरुड हिचं अभिनंदन! हर्षदानं देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून तिच्या या सुवर्ण कामगिरीचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
---
हर्षदा गरूड

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b09963 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top