
मावळात ग्रामपंचायतींचे रणांगण तापणार
तळेगाव दाभाडे, ता. ७ : गाव पातळीवर प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. वेगवेगळ्या कारणांनी काही पदे रिक्त झाली. या रिक्त पदांच्या निवडणुकीची घोषणा आयोगाने केली आहे. पोटनिवडणुकीत आपली वर्णी लागावी म्हणून अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
ग्रामपंचायत सदस्यांचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यासंदर्भात नायब तहसीलदार रावसाहेब चाटे म्हणाले, ‘‘१३ ते २० मे या कालावधीत १४, १५ व १६ मेची सार्वजनिक सुटी वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून होईल व छाननी संपेपर्यंत ही प्रक्रिया चालेल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २५ मे रोजी दुपारी ३ वाजल्यापर्यंत आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ५ जूनला मतदान व ६ जूनला मतमोजणी होईल.’’
मावळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींमधील एकूण १० रिक्त जागेची पोट निवडणूक होणार आहे. उदेवाडीमधील प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनुसूचित जमातीसाठी, साळुंब्रे येथील प्रभाग क्रमांक दोनमधील सर्वसाधारण स्त्रीसाठी, गोवित्री येथील प्रभाग क्रमांक एकमधील सर्वसाधारण स्त्रीची जागा, तसेच गोवित्रीतील प्रभाग क्रमांक तीनमधील अनुसूचित जमातीसाठीची जागा, कुसवली येथील प्रभाग क्रमांक एकमधील अनुसूचित जागा, चिखलसे येथील प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, ओझर्डे येथील प्रभाग क्रमांक एकमधील सर्वसाधारण स्त्रीसाठी, टाकवे बुद्रुक येथील प्रभाग क्रमांक एकमधील सर्वसाधारण जागा, खांड येथील प्रभाग क्रमांक एकमधील सर्वसाधारण जागा, ताजे येथील प्रभाग क्रमांक दोनमधील सर्वसाधारण स्त्रीसाठीच्या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्यासाठी काही सदस्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे.
सरपंच म्हणतात...
टाकवे बुद्रुकचे सरपंच भूषण असवले म्हणाले, ‘‘टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आहे. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली पोट निवडणुकीत आम्ही बाजी मारू.’’ कुसवलीच्या सरपंच चंद्रभागा दाते म्हणाल्या, ‘‘गावपातळीवरील ही निवडणूक मानाची आणि प्रतिष्ठेची आहे. सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात आम्ही यशस्वी होऊ.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pim22b09986 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..