
गुन्हे वृत्त
दारु धंदा बंद करण्याची तक्रार
दिल्याने टोळक्याची तरुणाला मारहाण
पिंपरी, ता. २३ : दारू धंदा पूर्णपणे बंद होण्यासाठी पोलिस चौकीत तक्रार दिल्याच्या रागातून चार जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना रावेत येथील रमाबाईनगर येथे घडली. गंगाधर देवेंद्र नाटेकर (वय २२), दीपक वाल्मिक घनगाव (वय २३, दोघे रा. रमाबाईनगर, रावेत) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचे साथीदार मोनेश देवेंद्र नाटेकर, रोहन वाल्मिक घनगाव यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी विशाल अप्पा चंदू कदम (रा. रावेत) याने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शनिवारी (ता.२१) घराच्या बाजूला थांबला होता. त्यावेळी आरोपी मोनेश तेथे आला. ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे’, असे म्हणून विशालला बाजूला नेले. विशाल याने आरोपी गंगाधर याचा दारूचा धंदा पूर्णपणे बंद होण्यासाठी पोलिस चौकीत तक्रार दिली होती. त्या रागातून गंगाधर याने विशाल याच्या डोक्यात फरशी मारली. तर, मोनेश याने गजाने मारहाण केली. दीपकने छातीवर दगड मारले. तर रोहन याने शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
रावेतमध्ये तरुणीचा विनयभंग
तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार रावेतमधील रमाबाईनगर येथे घडला. याप्रकरणी विशाल अप्पा कदम (पूर्ण नाव, पत्ता समजू शकला नाही) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. १९ वर्षीय तरुणीने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी कचरा टाकण्यासाठी गेली असता आरोपी तेथे आला. तिला जोरात ढकलले. यात ती खाली पडली असताना तिचे तोंड दाबले. यावेळी तिचे मंगळसूत्र तुटले. तसेच अंगावरील कपडे फाटले. तरुणी आरडाओरडा करू लागली असता तिला मारहाण व शिवीगाळ केली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
भोसरीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाला अटक
बहिणीच्या कंपनीतील मित्राने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी संतोष बाबासाहेब अंबाड (वय २७, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादीच्या बहिणीचा मित्र असून तिच्यासोबत कंपनीत काम करतो. पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपी घरात घुसला. मुलीचा हात पकडून, तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. तसेच कोणाला सांगितले तर सोडणार नाही, अशी धमकी दिली. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
चुलत सासऱ्याने सुनेला मारहाण करून घरात डांबले
चुलत सासऱ्यासह आठ जणांनी मिळून सुनेला व तिच्या सासऱ्याला मारहाण केली. तसेच दोघांना घरात डांबून ठेवले. हा प्रकार सुसगाव येथे घडला. शिवाजी भिमला जाधव, पिराजी जाधव, कपिल जाधव, अपील जाधव, कविता शिवाजी जाधव, विद्या बाळू राठोड, अंगुरी कपिल जाधव, गुणाबाई पिराजी जाधव (सर्व रा. पारखे वस्ती, सुसगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी महिला व तिचे सासरे पंडित जाधव हे चुलत सासरे शिवाजी जाधव यांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यास त्यांच्या घरी गेले. यावेळी आरोपींनी मिळून लाथाबुक्या व काठीने मारहाण केली. तसेच फिर्यादी महिलेसह तिच्या सासऱ्याला घरात डांबून ठेवले. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10046 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..