
‘पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या’
पिंपरी, ता. २७ : पूर्व पीएमपीएमएलच्या ११७ कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत सामावून घेण्याचे तसेच इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधांचा लाभ देणेबाबतच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी, असे निवेदन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांना दिले आहे.
या विषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले, ‘‘पूर्व पीएमपीएमएलचे एकूण २३५ कर्मचारी १९९९ मध्ये तात्पुरत्या स्वरूपात पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे तत्कालीन आयुक्तांच्या मान्यतेने वर्ग करण्यात आले होते. पीएमपीएमएलमधील एकूण २३५ कर्मचाऱ्यांपैकी ११८ कर्मचारी सेवानिवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. उर्वरित एकूण ११७ कर्मचारी सद्यःस्थितीत महापालिकेच्या सेवेत कामकाज करीत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची महापालिकेकडे जवळपास २० वर्षे सेवा झालेली आहे. त्यासर्व कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, तसेच इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधांचा लाभ देण्याबाबतचे आदेश राज्यशासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी माहे मार्चमध्ये आपणास दिलेले आहेत. पिएमपीएमएलमधील ११७ कर्मचारी अद्यापही महापालिकेच्या सेवेत आहेत. त्यामध्ये चतुर्थ श्रेणीमधील शिपाई, हेल्पर, क्लीनर, वाहनचालक, लेबर इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने पिएमपीएमएलच्या ११७ कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सर्व लाभ देण्याचे आदेश उपसचिवांनी दिलेले आहेत. परंतु, त्यातील ७ कर्मचारी (ता. ३१) मे २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे आदेशाची तत्काळ अमलबजावणी करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10061 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..