
पोलिसाला मारहाण करून तरूणाचा ठाण्यात गोंधळ
पिंपरी, ता. ३० : भांडण सुरू असलेल्या ठिकाणी गेलेल्या पोलिसाला तरुणाने मारहाण केली. या तरुणाला पोलिस ठाण्यात आणले असता, त्याने पोलिस ठाण्यात गोंधळ घालत वस्तूंची तोडफोड केली. ही घटना रावेत पोलिस ठाण्यात घडली.
विजय तुळशीदास शिरसट (वय ३८, रा. नंदनवन सोसायटी, वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक फैय्याज अब्दुलरशिद मुल्ला (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शुक्रवारी मध्यरात्री बिट मार्शल ड्यूटीवर असताना त्यांना एक कॉल आला. पुनावळे येथे एक जण दारू पिऊन ऑफिसमध्ये शिरून मारहाण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, आरोपी विजय हा त्याला कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून मालकाला मारहाण करीत होता. पोलिस त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने फिर्यादी व पोलिस नाईक बगाडे यांच्याशी झटापट करीत फिर्यादी यांना मारहाण केली. आरोपीला रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता तेथेही त्याने डॉक्टरांशी हुज्जत घालून तपासणी करण्यास नकार दिला. त्यांनतर त्याला रावेत पोलिस ठाण्यात आणले असता त्याने ठाण्यातही ठाणे अंमलदारांसह हवालदार डामसे यांच्याशी हुज्जत घातली. गोंधळ घालत रूममधील मॉनिटर उचलून पोलिस शिपाई गावडे यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर त्याने गावडे यांची वर्दी फाडत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10224 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..