
मूर्ती तयार करण्यासाठी लगबग गणेशोत्सवाचे वेध ः कच्चा माल व इंधन दरवाढीचा किमतीवर परिणाम
रमेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
जुनी सांगवी, ता. ५ ः गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटकाळामुळे सण उत्सवावर आलेल्या निर्बंधांमुळे नागरिकांना सण उत्सव नेहमीच्या पद्धतीने उत्साहात साजरे करता आले नाहीत. मात्र, यावर्षी सण उत्सवाला निर्बंध नसल्याने व मूर्तीच्या उंचीची मर्यादा नसल्याने गणेश भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. जुनी सांगवीतील कुंभारवाडा व परिसरातील गणेशमूर्ती तयार करण्याच्या कारखान्यांमधून कारागीर मंडळींची लगबग सुरू आहे. जुनी सांगवीतील कुंभारवाड्यातील श्रींच्या मूर्तीस सांगवीसह शहरात मोठी पसंती आहे. येथे सर्व प्रकारच्या मूर्ती कलाकार तयार करतात. प्लॅस्टर पॅरिस मूर्तींना जास्त मागणी असली तरी शाडू मातीच्या मूर्तींनाही सध्या मागणी वाढत आहे. अनेक सार्वजनिक मंडळे, घरगुती गणेश उत्सवासाठी हव्या तशा गणेश मूर्तींसाठी ऑर्डर देण्यासाठी सांगवीतील कारागीर मंडळींना पसंती देतात. यामुळे कुंभारवाड्यात वर्दळ सुरू आहे. दरवर्षी वेगवगळ्या संकल्पनेतील मूर्तींना विशेष मागणी असते. या वर्षी विठ्ठलाच्या रूपातील ‘माऊली’ या नावाने साकारलेली मूर्ती बाजारपेठेचे आकर्षण ठरत आहे. फेटाधारी जय मल्हार, जय हनुमान, बाहुबली, बालगणेशा, तांडव अवतार, शिवअवतार अशा गणेश मूर्तींना बच्चे कंपनीकडून घरगुती गणेश उत्सवासाठी विशेष मागणी असते. सध्या कच्चा माल, इंधन दरवाढीचा परिणाम मूर्तीकामावर वाढल्याने प्लॅस्टर ऑफ पँरिसची १० इंच उंचीची मूर्ती पाचशे रुपये तर सातशे ते आठशे रुपये शाडू मातीच्या मूर्तीचे किमान दर राहणार आहेत.
जुनी सांगवीतील कुंभारवाड्यात श्रींच्या आकर्षक, विविधरूपातील मूर्ती तयार करण्यात येतात. सध्या बाबू गेनू, जिलब्या मारुती, तुळशीबाग, कसबा, दगडूशेठ, मंडई, लालबागचा गणपती अशा तयार आकर्षक मूर्ती येथे उपलब्ध असल्याचे पहावयास मिळतात.
नवीन ताम्ररंगातील प्रयोग
सध्या बाजारात आलेल्या ताम्र रंग गणेशमूर्तीला दिल्याने गणेश मूर्तीचे वेगळेपण पहायला मिळत आहे. ताम्र रंगसंगतीमुळे मूर्तीला उठावदारपणा आला आहे. कॉपर रंगातील या मूर्ती १० इंचापासून पुढे उपलब्ध आहेत. सोनेरी फायबर गोल्डची रंगसंगती बाजारात पहिल्यांदाच आलेला सोनेरी फायबर गोल्ड रंगसंगतीमुळे मूर्तीचे दागिने, मुकुट आता अस्सल सोनेरी दिसू लागला आहे. फायबर गोल्ड सोनेरी रंगाच्या आविष्कारामुळे गणेशमूर्ती अधिक आकर्षक झाल्या आहेत.
एक फुटापासून ते मोठ्या मंडळाच्या मागणीनुसार मूर्ती उपलब्ध आहेत. काही मागणीनुसार बनवल्या जातात. सध्या
रंग, कच्चा माल, इंधन दरवाढ, वाहतूक खर्चामुळे यावर्षी मूर्तीदरात वाढ झाली आहे. हा आमचा पिढीजात व्यवसाय असून, लोकांच्या मागणीनुसार मूर्ती बनवून दिली जाते.
- कपिल कुंभार, जुनी सांगवी.
जुनी सांगवी ः कुंभारवाड्यात गणेशोत्सवासाठी कारागीर मूर्ती बनविण्यात व्यस्त आहेत.
फोटोः 14086, 14087
Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10239 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..