निगडी : नोकरी न दिल्याने महिलेचा राडा; जिममध्ये तोडफोड, डॉक्टरवरही हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news
महिलेचा डॉक्टरसह दोघांवर हल्ला

निगडी : नोकरी न दिल्याने महिलेचा राडा; जिममध्ये तोडफोड, डॉक्टरवरही हल्ला

पिंपरी - एका महिलेने क्लिनिकसह जिममध्ये राडा घातला. यामध्ये डॉक्टरसह दोघांवर प्राणघातक हल्ला करीत साहित्यांची तोडफोड केली. निगडी व आकुर्डी प्राधिकरण येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. पहिल्या घटनेप्रकरणी डॉक्टर राजीव अजित नगरकर (रा. यमुनानगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे यमुनानगर येथील त्यांच्या क्लिनिकमध्ये पेशंटशी चर्चा करीत होते. दरम्यान, क्लिनिकमध्ये शिरलेल्या आरोपी महिलेने टेबलावरील काचेचा ग्लास, मोबाईल, लॅपटॉप, काचेची फ्रेम यांची तोडफोड केली. तुटलेल्या फ्रेमचा काचेचा तुकडा घेऊन फिर्यादीला मारण्यासाठी आरोपी धावून आली. दरम्यान, फिर्यादीने स्वतःचा बचाव केला असता, आरोपीने त्यांच्या हाताला चावा घेतला. त्यानंतर पुन्हा फिर्यादीवर काचेच्या तुकड्याने दोन वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

त्यानंतर आरोपी महिला आकुर्डी प्राधिकरण येथे एका जिममध्ये गेली. येथेही तिने राडा घातला. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व जिमचे मालक मयुरेश केशव मोरे हे रात्री नऊच्या सुमारास जिमचे साहित्य व्यवस्थित लावून घरी जाण्याची तयारी करीत होते. दरम्यान, तेथे आलेल्या आरोपीने फिर्यादी यांना ''आय विल किल यू'' असे म्हणत तेथील लोखंडी डंबेल त्यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी तो हुकवला. पुन्हा डंबेल मारत असताना मोरे हे मध्ये आल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर आरोपी महिलेने तिच्याकडील काचेच्या तुकड्याने इमारतीतील लोकांना भीती दाखवत दहशत निर्माण केली.

दरम्यान, जिममध्ये ट्रेनरची नोकरी देण्याच्या मुद्द्यावरून या महिलेने जिममध्ये राडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली. निगडी पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10246 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..