गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

पिंपळे निलखमध्ये तरुणावर हल्ला

पिंपरी, ता. १२ : ''रागाने का बघतोस'', असे म्हणत चार जणांनी मिळून तरूणावर कोयत्याने वार केले. हा प्रकार पिंपळे निलख येथे घडला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
चैतन्य राजू आहिरे (वय १९, रा. विनायकनगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संकेत थोरात उर्फ बाळ्या, तेजस शिंदे, करण शेळके उर्फ बाब्या, बंड्या (सर्व रा. पिंपळे निलख) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संकेत व बंड्या यांना अटक केली आहे. फिर्यादी हे जेवण करून चालत असताना आरोपींनी त्यांना थांबविले. ''तू तेजस शिंदे याच्याकडे रागाने का बघतोस'', असे बोलून संकेत याने कोयत्याने चैतन्यच्या डोक्यात व हातावर वार केला. त्यानंतर, तेजसने चैतन्यच्या तोंडावर ठोसा मारून त्यांचे दात पाडले. तर उर्वरित आरोपींनी चैतन्यला लाथाबुक्यांनी मारहाण करत याला आज संपवून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर, आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पिंपरीत तरूणावर कोयत्याने वार

पिंपरी, ता. १२ : शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने दोघांनी मिळून एकावर कोयत्याने वार केले. ही घटना पिंपरीतील डिलक्स चौक येथे घडली.
या प्रकरणी अतुल लालचंद बैद (वय १९, रा आंबेडकर कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किरण डोंगरे, सुमीत (दोघे रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी अतुल यांना काहीही कारण नसताना शिवीगाळ केली. याचा जाब विचारला असता आरोपी सुमीत याने तुला काय करायचे ते कर, असे म्हणत धमकी दिली. तर, आरोपी डोंगरे याने ‘‘तुला लय माज आला आहे, तुझ्याकडे बघतोच’’, असे म्हणत अतुलच्या हातावर कोयत्याने वार केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लूटमार प्रकरणी दोघांना अटक

पिंपरी, ता.१२ : मारहाण करून ऐवज लुटल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. ही घटना आकुर्डी येथे घडली.
या प्रकरणी मनीष पंजाबराव कुऱ्हेकर (रा.आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सौरभ महेंद्र भोसले (वय २१), प्रतीक निरंद्र लिंबारे (वय २२) यांना अटक केली असून वेदांत बिराजदार यांच्यावर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी हे दुचाकीवरून जात असताना मोरया पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या मैदानात थांबले होते. दरम्यान, आरोपी त्यांच्याजवळ आले. दुचाकीची चावी व मोबाईल काढून घेत मारहाण केली. मोबाईलवरील फोन पे वर स्कॅन करून आरोपीने तीन हजार १३२ रुपये त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. तर एका आरोपीने घड्याळ व खिशातील एक हजारांची रोकड काढून घेतली. तसेच तुला बघून घेतो, अशी धमकी दिली.