नवी सांगवीत रस्त्यांची कामे अर्धवट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी सांगवीत रस्त्यांची कामे अर्धवट
नवी सांगवीत रस्त्यांची कामे अर्धवट

नवी सांगवीत रस्त्यांची कामे अर्धवट

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता.१३ ः नवी सांगवी भागातील कृष्णा चौक, साई चौक परिसरातील रस्ते, पदपथ यांची अर्धवट आणि संथगतीने सुरू असलेली कामे तसेच रखडलेल्या कामांमुळे नागरिकांना रहदारीचा त्रास सहन करावा लागत आहे. नवी सांगवी येथील वर्दळीचा असलेला साई चौक गेली अनेक महिन्यांपासून खड्डेमय झालेला आहे.
या चौकात अनेकदा स्थापत्य विभागाकडून येथील तात्पुरती डागडुजी करण्यात येते. मात्र, पावसामुळे पुन्हा खड्डे पडून ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होत आहे. या चौक व रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण काम व चौक सुशोभीकरण काम प्रस्तावित असल्याचे स्थापत्य विभागाकडून अनेकदा सांगण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष काम कधी होणार ? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवीला जोडणारा साई चौक, कृष्णा चौक हे प्रमुख चौक आहेत. कृष्णा चौकातील कामे गेली अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. यातच पडणारा पाऊस व सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना वहातूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यावर सांगवी पोलिस ठाणे, प्रमुख बाजारपेठ, भाजी मंडई, खाऊ गल्ली असल्याने साई चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. चौकात अनेकदा खड्डे चुकविताना दुचाकी घसरून अपघात होणे, वाहतूक कोंडीमुळे गाड्या एकमेकांना घासणे अशा अपघातांच्या घटनांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. येथील चौक व रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

‘‘नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील बहुतांश प्रमुख रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण झाले आहे. मात्र, कृष्णा चौक व साई हे मुख्य चौकच खड्डेमय असल्याने दोन्ही ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.’’- ज्ञानेश्वर मदबल, नागरिक

‘‘गेल्या दोन महिन्यांपूर्वी मोठ्या पावसात कृष्णा चौक पावसाच्या पाण्याने तुंबला होता. काही महिन्यांपासून या भागातील कामे सुरू आहेत. सध्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना कसरत करावी लागत आहे.’’ - विजय शिंदे, नागरिक

‘‘कृष्णा चौकातील किरकोळ कामे सुरू आहेत. याचबरोबर साई चौकातील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली होती. पावसाच्या उघडिपीनंतर येथील साधारण ७० मीटर रस्त्याचे व ३० मीटर चौकाचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.’’- जयकुमार गुजर, उपअभियंता (स्थापत्य विभाग) महापालिका