दिवाळीनंतर बाजारपेठ सुनीसुनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीनंतर बाजारपेठ सुनीसुनी
दिवाळीनंतर बाजारपेठ सुनीसुनी

दिवाळीनंतर बाजारपेठ सुनीसुनी

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. ३० ः दिवाळी सणाच्या लगबगीनंतर सध्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. दिवाळी सुट्यांमध्ये शहरात वास्तव्यास असलेली बहुतांश मंडळी आपल्या मूळगावी गेल्याने बाजारपेठेत भाजी, दूध, बेकरी विक्री कमी होऊन तुरळक वर्दळ पाहायला मिळत आहे. जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात खानदेश, मराठवाडा, सातारा, कोल्हापूर, केरळ, कर्नाटक आदी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. वर्षातील येणाऱ्या गावजत्रा, दिवाळी सण व सुट्यांचा आनंद मूळगावी घेण्यासाठी दिवाळी सणाच्या सुटीच्या काळात मोठ्या प्रमाणावर परिसरात असलेली मंडळी आपल्या गावी जाणे पसंत करतात.

कामधंद्यानिमित्त महाराष्ट्र व विविध राज्य प्रांतातून आलेले नागरिक शहरात वास्तव्यास आहेत. नवी सांगवी, पिंपळे गुरव, जुनी सांगवी परिसरात मराठवाडा जनविकास संघ मित्र मंडळाचे पंधरा हजार सदस्य आहेत. तर साधारण अंदाजे वीस हजार नागरिक वास्तव्यास आहेत. सातारा मित्र मंडळ, खानदेश मित्र मंडळ, कोल्हापूर मित्र मंडळ, अय्यप्पा स्वामी मंदिर समिती ही येथील संघटनात्मक कामाची रचना असलेली या भागातील प्रमुख मंडळे आहेत.

कोट-
मराठवाडा जनविकास संघ मित्र मंडळाचे परिसरात पंधरा हजार सदस्य आहेत. मराठवाडा हा पाणी टंचाईचा भाग म्हणून पूर्वी ओळखला जायचा. शेतीवर अवलंबून असलेला भाग त्यामुळे कामधंद्यानिमित्त अनेक कुटुंबे शहरात आली आहेत.
- अरुण पवार, अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ, पिंपळे गुरव

सांगवी परिसरात केरळी बांधव मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. पिंपळे गुरव, सांगवी परिसरात चारशेच्यावर कुटुंब रहिवासी आहेत. नोकरी, कंपनी काम, शिक्षण यासाठी आलेली मंडळी येथे स्थिरावली आहेत.
- राधाकृष्णन नायर, अध्यक्ष, अय्यप्पा स्वामी मंदिर समिती, जुनी सांगवी

सातारा जिल्ह्यातील अनेक मंडळी शहरातील विविध भागात वास्तव्यास आहेत. सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव भागात मंडळाचे ८७५ सदस्य आहेत. काम, नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्ह्यातील मंडळी परिसरात वास्तव्यास आहेत.
- शिवाजीराव माने, अध्यक्ष, सातारा मित्र मंडळ

सांगवी परिसरात खान्देश भागातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. शिक्षक, डॉक्टर, शासकीय अधिकारी, हॉटेल व्यावसायिक, उद्योजक अशी मंडळी शहराच्या उद्योगचक्रात योगदान देत आहेत.
- उमेश बोरसे, अध्यक्ष, खान्देश मित्र मंडळ