काळेवाडीत पवना नदी बुजविण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळेवाडीत पवना नदी बुजविण्याचा प्रयत्न
काळेवाडीत पवना नदी बुजविण्याचा प्रयत्न

काळेवाडीत पवना नदी बुजविण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

काळेवाडी, ता. १९ : पवना नदीला जोडणारे लहान मोठे बरेचसे ओढे-नाले गायब झाले आहेतच. मात्र, आता पवना नदीचे पात्रच बुजविण्याचे काम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरीगाव पूल व काळेवाडीतील नदी समांतर १८ मीटर डीपी रस्त्याजवळ असलेले नदीपात्र राडारोडा टाकून बुजविले जात आहे. उघडपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे महापालिका डोळेझाक करत असल्याने महापालिका झोपेत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. वाढत्या शहरीकरणामुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्याचा दुष्परिणाम कोल्हापूरच्या महापुराच्या घटनेतून सर्वांनीच अनुभवला आहे. मात्र, त्या घटनेतून कोणत्याच शासकीय यंत्रणांनी धडा घेतल्याचे दिसत नाही. काळेवाडी, रहाटणी परिसरात निर्माण होणारा राडारोडा मागील अनेक महिन्यांपासून थेट पवना नदीत आणून टाकला जात आहे. यामुळे कचरा, बांधकामातील राडारोडा, दगडधोंडे, तुटलेल्या फरशा आदी वस्तूंचा भलामोठा ढिगारा नदी पात्रात तयार झाला आहे. काही दिवसांनी जेसीबी मशिनच्या माध्यमातून रातोरात हा ढिगारा सपाट केला जाईल. त्यामुळे साहजिकच नदीचे पात्र अजून अरुंद होईल. दरम्यान, सुट्टीच्या दिवशी किंवा सकाळी लवकर, सायंकाळी व रात्री याठिकाणी मोठ्याप्रमाणात राडारोडा टाकला जातो. थेट नदीचे पात्र बुजविण्याचे धाडस महापालिका अधिकाऱ्यांच्या मदतीनेच होऊ शकते. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
चौकट :
क्रमांक नसलेल्या वाहनातून राडारोडा
या ठिकाणी वाहून आणला जाणारा राडारोडा क्रमांक नसलेल्या वाहनांतून आणला जातो. त्यामुळे नियोजनबद्ध नदी बुजविण्याचे काम सुरू असून महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस व मोटार वाहन विभागाने तातडीने लक्ष घालून पवना नदी वाचवावी. अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया
नदीपात्रात राडारोडा टाकणे कायद्याने गुन्हा आहे. आम्ही जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी कोणीच दिसले नाही. राडारोडा टाकताना वाहन दिसले की, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- जगन्नाथ काटे, उपद्रव शोधक अधिकारी, पर्यावरण विभाग, महापालिका