
लिंबू- मिरची, उताऱ्याचा रस्त्यावर खच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून स्वच्छता
जुनी सांगवी, ता. २ ः लिंबू- मिरची, बिब्बा, नारळ, उतारा असे साहित्य चौक व रस्त्यावर फेकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
या वस्तूंना ओलांडून जाऊ नये, या भीतीमुळे अनेकदा या वस्तू चुकविण्याच्या नादात अपघात होतात. या साहित्यामुळे सुशोभीकरण करण्यात आलेले रस्ते, चौक यांना बकालपणा येत आहे. परिणामी स्वच्छता कर्मचाऱ्यांना याची स्वच्छता करावी लागते. पिंपळे गुरव, दापोडी, नवी सांगवीला जोडणाऱ्या रामकृष्ण मंगल कार्यालय चौकातील चबुतऱ्यावर नागरिकांकडून टाकण्यात आलेल्या लिंबू-मिरची, नारळ, बिब्बा व तर साहित्याची अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी संकलन करून स्वच्छता केली.
हा रहदारी व वर्दळीचा मुख्य चौक असून, स्मार्ट सिटी अंतर्गत येथील चौक व रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण, पेव्हींग ब्लॉक, व वाहतूक बेट तयार करण्यात आलेले आहे. वाहतूक संचलन व्हावे, याचबरोबर चौकाचे सौंदर्य वाढावे यासाठी महापालिकेने या चौकात बासरी धरलेल्या हातांची प्रतिकृती लावण्यात आलेली आहे. या चबुत-यावर नागरिकांकडून रोज लिंबू मिरची, बिब्बा, नारळ अशा वस्तू टाकल्या जातात. अनेक नागरिकांकडून रस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीमुळे अपघात होतात, अशा तक्रारी आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राजू कदम व सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या वस्तूंचे संकलन केले.
पिंपळे गुरव येथील बसस्थानक परिसर, शहरातील भोसरी येथील उड्डाणपुलाखाली या ठिकाणी असे नियमित प्रकार घडत असल्याचे समिती सदस्यांकडून सांगण्यात आले. यात टाचणी टोचलेले लिंबू, हळदी कुंकू, दोरा, नारळ, काळ्या कापडी बाहुल्या, नैवेद्य आदींचा समावेश असतो. भटकी जनावरे या भोवती गोळा होतात. यामुळे वाहनचालकांनाही गाडी पंक्चर होणे, अपघात होणे अशा घटनांना सामोरे जावे लागते.
‘‘सर्व चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. तरीही नागरिक ऐन चौकाच्या चबुत-यावर हे साहित्य टाकतात. अनेकदा असे साहित्य चौकात रस्त्यावर पडलेले असते.’’
-रियाज शेख, नागरिक
फोटोः 14648