
शाईफेक प्रकरणातील तिघांना जामीन मंजूर
पिंपरी, ता. १४ : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणातील तीनही आंदोलकांना पिंपरी न्यायालयाने बुधवारी (ता.१४) जामीन मंजूर केला. समता सैनिक दलाचे संघटक मनोज भास्कर घरबडे (वय३४, रा. पिंपरी), समता सैनिक दलाचे सदस्य धनंजय भाऊसाहेब इजगज (वय २९), वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ (४०, रा. आनंदनगर, चिंचवड) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला, सरकारी कामात अडथळा आदी कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, प्राणघातक हल्लाचा गुन्हा दाखल झाल्याने विविध स्तरातून नाराजी व निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच हे कलम वगळण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान, आंदोलकांवरील प्राणघातक हल्ल्याचे कलम वगळण्याचा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर तशी कार्यवाही करण्यात आला.
दरम्यान, बुधवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तीनही आंदोलकांना पिंपरी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी प्राणघातक हल्लाचे कलम वगळून अहवाल सादर केला. त्यानंतर न्यायालयाने साऱ्यांना जामीन मंजूर केला.