सांगवीत पवना नदी संवाद यात्रेला प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवीत पवना नदी संवाद यात्रेला प्रारंभ
सांगवीत पवना नदी संवाद यात्रेला प्रारंभ

सांगवीत पवना नदी संवाद यात्रेला प्रारंभ

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. २६ ः महाराष्ट्र शासन, जलबिरादरी व पवना नदीसाठी काम करणाऱ्या‍ इतर सामाजिक संस्था आणि व्यक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर ‘चला जाणूया नदीला’, अभियान राबवले जात आहे. ज्यात महाराष्ट्रातील जवळपास १०९ नद्यांवर नदी संवाद यात्रांचे आयोजन केले जात आहे. त्यांपैकीच एक असणाऱ्या जुनी सांगवी येथील पवना नदीवर शनिवार (ता. २४) संगमेश्वर मंदिराजवळ नावेतून पाण्याचे पूजन करून नारळ अर्पण करून या यात्रेचे उद्‍घाटन करण्यात आले.
या यात्रेमध्ये विविध विद्याशाखांत शिक्षण घेणारे तीस विद्यार्थी सात दिवस पूर्णवेळ पायी चालणार आहेत. या पदयात्रेचा मूळ उद्देश नदी, शासन व समाज यांमध्ये संवाद घडवून आणणे हा असून, नदीची सद्यःस्थिती व सातत्याने पूर व दुष्काळ यांची वाढत असलेल्या वारंवारितेला समजून घेणे त्यासोबतच त्यांच्या निराकरणासाठी कोण कोणत्या उपाययोजना करता येतील, त्यांचा अभ्यास करणे हा आहे.
नदीला भेडसावणाऱ्या समस्यांवर काम करणाऱ्या या युवकांचा एक गट तयार व्हावा, या हेतूने अभ्यासत्रांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. नवी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर स्मशानभूमी घाट येथे जलबिरादरी महाराष्ट्राचे अध्यक्ष नरेंद्र चुघ तसेच रोटरी कल्ब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक प्रदीप वाल्हेकर व गणेश बोरा यांनी व पिंपरी-चिचवड जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता विजय पाटील व कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर आदी उपस्थित होते.
इकॉलॉजिकल सोसायटी, पुणेचे विश्वस्त डॉ. गुरुदास नूलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यात त्यांनी नदीची परिसंस्था व त्याचा आपल्या जीवनाशी असणारा थेट संबंध यावर मार्गदर्शन केले. यात्रेच्या पुढील प्रवासादरम्यान नटसम्राट निळू फुले सभागृहात पर्यावरण प्रेमी,सामाजिक कार्यकर्ते श्री. राजू सावळे यांनी पवना नदीवर केलेल्या कामांचे अनुभव कथन केले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांमध्ये चर्चासत्र पार पडले. ही पदयात्रा पुढील सात दिवसांमध्ये पवना नदीकाठच्या गावांमध्ये प्रवास करत नदीची सद्यःस्थितीत तसेच नदी व लोकांचा सहसंबंध लोकसंवादातून जाणून घेण्यात येणार आहे. या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.