रेडझोनच्या विरोधात एकवटले रहिवासी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडझोनच्या विरोधात एकवटले रहिवासी
रेडझोनच्या विरोधात एकवटले रहिवासी

रेडझोनच्या विरोधात एकवटले रहिवासी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ ः रावेत, किवळे रेडझोनची हद्द दोन हजार यार्ड करण्याच्या विरोधात स्थानिक रहिवासी, शेतकरी एकवटले आहेत. एकत्रित लढा लढण्याची भूमिका घेतली जात आहे. महापालिका प्रशासनानेही संरक्षण विभागाकडे भूमिका मांडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

रावेत, किवळे भागात गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे देहूरोड आयुध निर्माण कारखान्याला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून कारखान्याच्या संरक्षक भिंतीपासून १.८२ किलोमीटर क्षेत्र रेडझोन घोषित करण्याचा आदेश संरक्षण विभागाने जिल्हाधिकारी व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला दिला आहे.

महापालिकेची भूमिका
ही गावे ऑक्टोबर १९९७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाली. त्यांच्यासाठी २००१ मध्ये विकास योजना प्रसिद्ध होवुन २००७ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे ७० टक्के क्षेत्रामध्ये रहिवासी इमारती विकसित झाल्या आहेत. विकास योजना तयार करताना महापालिकेने रावेत, किवळे या समाविष्ट गावांमध्ये संरक्षण खात्याच्या मागणीप्रमाणे संरक्षित झोन प्रस्तावित केले होते. त्यावेळी संरक्षण खात्याने कोणतीही सूचना किंवा हरकत घेतली नाही. त्यामुळे संरक्षित झोन घोषित करू नये, अशी शिफारस महापालिकेने केली आहे.

किवळेचे माजी सरपंच सुदाम तरस म्हणाले, ‘‘आधीचा आणि आताही चुकीच्या पद्धतीने रेडझोन लादला जात आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना निवेदन दिले जाणार आहे. न्याय मार्गाने लढा देण्यासाठी बाधित नागरिक व शेतकऱ्यांची मिळून रेडझोन संस्था स्थापन केली आहे.’’

किवळे, रावेत रेडझोन बाबतचा प्रश्न लोकसभेत मांडला आहे. संरक्षण मंत्री व संरक्षण विभागाचे सचिव यांच्या सोबत चर्चा झाली आहे. संबंधित आस्थापनांकडून माहिती घेऊन पुढील निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले आहे. नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा लढा सुरूच आहे.
- श्रीरंग बारणे, खासदार