
भाजपने चिन्ह बाजूला ठेवून उमेदवार द्यावा ः आमदार शेळके
जुनी सांगवी, ता. ३१ ः भाजपने कमळ चिन्ह बाजूला ठेवून उमेदवार द्यावा, आम्ही निवडणूक बिनविरोध करू. भाजपच्या उमेदवाराला कोणतीही सहानुभूती मिळणार नाही. कारण भाजपची बूथ कमिटीची तयारी दोन महिन्यांपासून सुरू होती, असे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पिंपळे गुरव येथील चंद्रभागा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे नियोजन माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केले होते. यावेळी भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, कविता आल्हाट, प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, नाना काटे, अतुल शितोळे, अरुण पवार, राजू लोखंडे, श्याम जगताप, विशाल वाकडकर, प्रशांत सपकाळ, तानाजी जवळकर, शिवाजी पाडुळे, वर्षा जगताप, विनोद नढे, नितीन सोनवणे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनील शेळके म्हणाले, ‘‘पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. अंतर्गत गटतट यामुळे राष्ट्रवादीची सत्ता गेली. मावळाची जनता माझ्या पाठीमागे उभी राहते, मग पिंपरी चिंचवडमधील जनता का पाठीमागे राहत नाही. विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्यात आपण कमी पडतो. संघटनात्मक काम केले पाहिजे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बुथप्रमुख महत्त्वाचा घटक आहे. सोबत शिवसेना, काँग्रेस, वंचित असेल. पण मतदारांपर्यंत पोचले पाहिजे. आपला अजेंडा पोहोचवला पाहिजे. मतभेद, गैरसमज बाजूला ठेवा.’’ बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केली. विनायक रणसुंभे यांनी प्रास्ताविक केले.