
वंचित बहुजन आघाडीचा राहुल कलाटे यांना पाठिंबा
पिंपरी, ता. १६ : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कलाटे यांची ताकद वाढली आहे. चिंचवडमध्ये भाजपला राहुल कलाटे रोखू शकतात. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने कलाटे यांच्या पाठीशी उभी राहील, असे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडीनेही वंचितकडे पाठिंब्याची मागणी केली होती. पण, वंचितने कलाटे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पहाटेच्या शपथविधीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात खुलासा केलेला आहे आणि त्यामध्ये सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशीर्वाद होता, असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपबरोबर जाणार नाही, असा कुठेही खुलासा केलेला नाही.
चिंचवडमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचितच्यावतीने पाठिंबा देण्यात आला होता. त्यांनी १ लाख १२ हजार मते त्यावेळी घेतली होती. कलाटे हे शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते होते. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी व कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी, असा आमचा आग्रह होता. परंतु, तसे घडले नाही.
पाठिंबा दिल्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मनापासून आभार मानतो. वंचितचा पाठिंबा, चिंचवडच्या जनतेचे आशिर्वाद या जोरावर मी नक्कीच विजयी होईल.
- राहुल कलाटे, अपक्ष उमेदवार.