
गुन्हे वृत्त
कोयता गँगचे असल्याचे सांगत
महिलेला जीवे मारण्याची धमकी
पिंपरी : रस्त्यात उभा असलेला टेम्पो बाजूला घेण्यास सांगणाऱ्या महिलेला धमकी देत गैरवर्तन केले. ‘आम्ही कोयता गँगचे असून पोलिसही आम्हाला काही करू शकत नाहीत’, असे म्हणत त्यांनी दहशत निर्माण केली. महिलेच्या अंगावर गाडी घालून तिच्याशी गैरवर्तन करीत विनयभंग केला. जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार हिंजवडीतील वाडकर चौक येथे घडला. तुषार कोकरे, नितीन कोकरे व दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पुण्याहून हिंजवडीकडे जात होत्या. दरम्यान, वाडकर चौकात एक टेम्पो रस्त्यात उभा होता. वाहतूक कोंडी झाली होती. खोदकाम सुरु असल्याने व टेम्पोत स्पीकरही जोरात सुरु असल्याने महिलेने स्पीकर बंद करून टेम्पो बाजूला घेण्यास सांगितले.
त्यावरून तुषार व नितीन यांनी महिलेला शिवीगाळ केली. एका आरोपीने ‘मी कोथरूडचा आहे. कोयता गँगचा आहे. पोलिस आम्हाला काहीही करू शकणार नाहीत’, असा दम दिला. त्यानंतर महिलेने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिस येईपर्यंत फिर्यादी घटनास्थळी थांबल्या होत्या. त्यांचे पती व शेजारील व्यक्तीला घडलेला प्रकार सांगत असताना नितीन कोकरे दुचाकीवरून आला. त्याने दुचाकी थेट महिलेच्या अंगावर घातली. महिलेसोबत गैरवर्तन करून त्यांना शिवीगाळ करीत विनयभंग केला. ‘मी मुळशीचा आहे. मी सात ते आठ वेळा जेलमध्ये गेलो असून माझे कोणी काहीही करू शकत नाही. तुला जीवे मारून टाकतो’, अशी त्याने धमकी दिली. यावेळी महिला खुर्चीवरून खाली पडल्याने त्यांच्या गुडघ्याला व हाताला दुखापत झाली.
--------------------------
आरोपीने पोलिसाला ब्लेडने मारण्याचा प्रयत्न
दाखल गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसाला आरोपीने ब्लेडने मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने आत्महत्येची धमकी देत स्वतःवरही ब्लेडने वार केल्याचा प्रकार देहूरोड येथे घडला. जलसिंग राजपुतसिंग दुधानी (वय ३५, रा. जांभुळगाव , ता. मावळ) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस कर्मचारी संतोष रामदास काळे (रा. देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात फिर्यादी हे आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले. दरम्यान, आरोपी हा स्वतःची अटक टाळण्यासाठी फिर्यादीच्या अंगावर धावून गेला. त्यांना धक्काबुक्की करून ब्लेडने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘मला पकडले तर तुम्हाला दाखवतो, आत्महत्या करतो’ अशी धमकी देत स्वतःवर ब्लेडने वार करून घेतले. जखमी आरोपीवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
--------
किरकोळ कारणावरून दोघांना बेदम मारहाण
धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात चौघांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना चिंचवड येथे घडली.
ओमकार संभाजी खेडकर (रा. तानाजीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव ऊर्फ पिल्या कांबळे, शुभम चंद्रकांत कळमकर, पार्थ मांडवकर, आदित्य ऊर्फ भद्रया चव्हाण (सर्व रा. चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र दर्शननगरी, काळेवाडी पुलाजवळील हॉटेलात पार्सल आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, आरोपी शुभम व पार्थ यांचा फिर्यादीला धक्का लागला. यावरून झालेल्या किरकोळ वादातून आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या मित्राला दगडाने, हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात ते जखमी झाले.