
रहाटणीत शिवजयंती उत्साहात
रहाटणी, ता. ११ : राजकारण, मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवून सर्वाना एकत्रित घेवून, शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार रहाटणीतील तरुणांनी करत यावर्षीचा ‘एक गाव एक शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला. विशेष म्हणजे अखिल रहाटणी गाव शिवजयंती उत्सव मंडळात कोणीही अध्यक्ष, प्रतिनिधी नव्हता तर प्रत्येक जण पद न पाहता स्वतःला शिवरायांचा मावळा समजून या सोहळ्यात सहभागी झाला होता.
सकाळी सातला सिंहगडावरून ज्योत घेऊन आलेल्या मुलांचे आगमन झाले. यावेळी इतर ५० खेळाडू आणि गावातील धावपटू होते. तसेच सकाळी ९ ते ११ रहाटणी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. भव्य २० फूट पांडुरंग मूर्ती व ३०० वारकऱ्यांसह गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा साजरा करण्यात आला.
सायंकाळी ६ ते १० वाजता साऊंड सिस्टीम, लाईट शो, फायर शो व पावनखिंड फेम अवधुत गांधी (आळंदीकर) गायक शिवबा राज यांचे गाणे सादर झाले. तसेच कालीचरण महाराज यांच्या शिव तांडव स्तोत्रला तरुणाईने उदंड प्रतिसाद दिला.
या उत्सवासाठी गावातील सर्वच तरुणांनी पुढाकार घेत उत्तम नियोजन केले होते. संपूर्ण परिसर ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा घोषणांनी दणाणून गेला होता. लहान मुलांपासून ते महिला, तरुण व ज्येष्ठ मंडळीनी या उत्सवात हिरीरीने सहभाग घेतला होता.
फोटो ओळ : रहाटणी : शिवजयंती रहाटणी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान काढलेले पालखी मिरवणूक.
फोटोः 15164