अरुंद रस्त्यामुळे अपघाताचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरुंद रस्त्यामुळे अपघाताचा धोका
अरुंद रस्त्यामुळे अपघाताचा धोका

अरुंद रस्त्यामुळे अपघाताचा धोका

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १७ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बा. रा. घोलप महाविद्यालय कॉर्नर रस्त्याच्या संथगतीच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. एका बाजूला खोदकाम करून केलेले अर्धवट काम व दुसऱ्या बाजूला अरुंद रस्ता यामुळे वाहनचालकांना येथे रहदारीस कसरत करावी लागत आहे.
गेली काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे हा रस्ता रहदारीसाठी धोकादायक ठरत आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह आलेल्या अवकाळी पावसामुळे येथून रहदारी करताना नागरिकांची तारांबळ उडाली. खड्डेमय अरुंद रस्ता व सुरू असलेल्या कामामुळे माती चिखलात गाड्या घसरण्याच्या प्रकाराला नागरिकांना सामोरे जावे लागले. जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरवकर नागरिक पुणे व चिंचवड, पिंपळे निलख आदी भागाकडे ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. उतार व वळणाचा रस्ता त्यातच रखडलेल्या कामामुळे अरुंद झाल्याने येथे अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे. पुणे, औंध व इतर भागात शाळा महाविद्यालयासाठी येथून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी बस वाहतूक होते.

- खासगी प्रवासी वाहतूक वाहनांची या भागातून वाहतूक होत असल्याने कोंडीत भर
- वाहनांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी वाहतूक कोंडी
- वाहतूक पोलिस प्रशासनाकडून खासगी वाहतुकीकडे दुर्लक्ष
- वाहतूक थांबल्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने कोंडीचा त्रास

‘‘गेली अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडले होते. सध्या काम संथगतीने सुरू आहे. यामुळे नागरिकांना रहदारीचा त्रास सहन करावा लागत आहे.’’
- अतुल शितोळे, माजी नगरसेवक

‘‘पहाटे व्यायाम व फेरफटका मारण्यासाठी पूर्वीपासून या रस्त्याचा नागरिक मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. सध्या सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना इतर पर्यायाचा उपयोग करावा लागत आहे. कोंडी व अरुंद रस्त्यामुळे अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे.’’
- अविनाश मारणे, रहिवासी

‘‘येथील सेवा वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. कॉंक्रिटीकरण कामाची सध्या पूर्वतयारी सुरू आहे. रस्ता सुरक्षाविषयक सूचना व बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. दुहेरी वाहतुकीऐवजी सांगवी फाट्याकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक व येण्यासाठी शनी मंदिर फेमस चौक या रस्त्याचा उपयोग करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. काम गतीने सुरू आहे.
- विजय कांबळे, अभियंता स्थापत्य विभाग ह प्रभाग