
‘पवनेश्वर मंदिरासमोरील स्वच्छतागृहा साफसफाई करावे’
काळेवाडी, ता. १७ : पिंपरीगाव ते काळेवाडी रस्त्यालगत असलेल्या पवनेश्वर मंदिरासमोरील स्वच्छतागृहाची साफसफाई केली जात नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पवनेश्वर मंदिरात शहराच्या विविध भागातून भक्तगण दर्शनासाठी येतात. सोमवारी व सायंकाळी मोठी गर्दी या मंदिरात असते. मंदिराच्या समोरच महापालिकेचे स्वच्छतागृह आहे. मात्र, या स्वच्छतागृहाची साफसफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरते.
याबाबत ज्येष्ठ नागरिक सुखदेव जाधव म्हणाले की, स्वच्छतागृहांची दिवसातून दोनदा केमिकलचा वापर करून साफसफाई करणे ठेकेदारास बंधनकारक असते. मात्र, स्थानिक पुढारी व महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी यांना हाताशी धरून, या नियमाकडे डोळेझाक केली जाते. येथील स्वच्छतागृहाची साफसफाई होत नसल्याने लोक दुर्गंधीमुळे बाहेरच लघुशंका करतात. ती थेट मंदिराच्या समोर येते. येथे महिला व लहान मुले येतात. त्यांनाही हे चित्र पहावे लागते.
फोटोः 15199