
सांगवीत पालिकेकडून मुळानदी जलपर्णीमुक्त
जुनी सांगवी, ता. २१ ः सांगवी परिसरातील मुळा नदी पात्र जलपर्णीमुळे हिरव्यागार शेतासारखे भासू लागले होते. यामुळे डास कीटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होऊन नागरिकांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या बाबत नागरिकांमधून जलपर्णी हटविण्याची मागणी होत होती. याबाबत शुक्रवारी (ता. १७) ‘सकाळ’मधून सचित्र वृत्त प्रसिद्ध करण्यात आली होती. जलपर्णीमुळे मुळा नदी किनारा परिसरातील मधुबन सोसायटी परिसर, शितोळेनगर, मुळानगर, ढोरेनगर, पवारनगर, पवनानगर, संगमनगर आदी भागातील नदी किनारा रहिवासी भागांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
बातमीची दखल घेत पालिका प्रशासनाकडून मधुबन सोसायटी भागातील मुळानदीपात्रातील जलपर्णी काढण्यात आल्याने डास किटकांचा उपद्रव कमी होणार असल्याने सांगवीकरांना दिलासा मिळाला आहे. मुळा नदीकाठावरील मधुबन येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात डासांच्या त्रासामुळे नागरिक जाण्यास धजावत नव्हते. जलपर्णी हटविल्यानंतर मुळानदीपात्र मोकळे दिसू लागले आहे.