टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांसाठी चारा- पाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांसाठी चारा- पाणी
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा उपक्रम
टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांसाठी चारा- पाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा उपक्रम

टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांसाठी चारा- पाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा उपक्रम

sakal_logo
By

रहाटणी, ता. २१ : उन्हाळ्याला सुरवात झाली असून, तापमानात वाढ होत आहे. नदी नाल्यांमधील पाणी आटले आहे. त्यामुळे कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून, त्यापासून पक्षांसाठी चारा पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा उपक्रम महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राबवला. तसेच ''ड'' क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या परिसरात लोकांमध्ये पक्षी संवर्धनासाठी जनजागृती केली.

दिवसेंदिवस चिमणी, कावळे यांच्यासारखे पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत. भीषण उन्हाळा बघता बऱ्याच वेळी पक्षांना खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांचा जीवसुद्धा जातो. त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांनी कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंवर रिसायकलिंग करून, त्यापासून चिमण्यांना ऊन, वारा, पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी कृत्रिम घरटे बनवली. मातीची भांडे, प्लॅस्टिकचे डबे यांचा वापर करून पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी आणि धान्य ठेवण्याची व्यवस्था केली. अशा वस्तू विविध उद्यान परिसर व झाडांवर अडवण्यात आल्या. जेणेकरून पक्षांना आपली तहान- भूक भागवता येईल.

‘ड’ क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड, सहायक आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, रोहित चंदेल, सुखदेव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २६ मधील बेसिक्स टीमने हा उपक्रम राबवला.

या अभिनव उपक्रमांमध्ये टीम बेसिक्सचे प्रतिनिधी माधुरी पाटील, पार्वती कळसे, ज्योती केंगार, नवनाथ लोंढे, लखन जाधव, गौतम कांबळे, ओंकार क्षीरसागर, क्षितिज गायकवाड, सागर शिंदे, रवी राठोड यांच्यासह शाळेतील मुलांनी सहभाग नोंदवला.

‘‘आज शहरात चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चाललेल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवला.
- सुखदेव लोखंडे, प्रमुख, प्रभाग क्रमांक २६.

फोटो ओळ : रहाटणी : टाकाऊतून वस्तूंपासून पक्षांसाठी चारापाण्याची सुविधा करताना आरोग्य कर्मचारी.

फोटोः 15223