
जुनी सांगवीत विविध उपक्रमांनी डॉ. आंबेडकर जयंती साजरी
जुनी सांगवी, ता. १४ ः दापोडी, जुनी सांगवी परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, कार्यकर्ते व समाज बांधवांकडून दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संदीप गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. विविध मित्र मंडळांच्या वतीने सवाद्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय बौद्धजन विकास समिती यांच्या वतीने त्रैलोक्य बौद्ध महासंघ परिक्षा मार्गदर्शन केंद्रापासून महिलांची भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती. सजवलेला रथ व पाचशे महिला दुचाकीवरून डोक्यावर निळे फेटे, हातात निळे झेंडे घेऊन या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. दापोडी त्रैलोक्य बौद्ध महासंघ स्पर्धा परिक्षा केंद्र येथून पुतळा परिसर, जुनी सांगवी वसंतदादा पुतळा मार्ग, चंद्रमणीनगर, एकता चौक, पवारनगर या मार्गावर फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन व समाज बांधवांच्या वतीने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. येथील मधुबन मित्र मंडळ, सीझन सोशल ग्रुप, प्रशांत शितोळे मित्र परिवार यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.