
सांगवीत पशू-पक्षांसाठी चारा पाण्याची व्यवस्था
जुनी सांगवी, ता. १६ ः येथे वन्य पशू-पक्षी संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून वाढत्या उन्हापासून पशू-पक्ष्यांचे संरक्षण व्हावे याकरिता चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तीव्र उन्हाच्या झळा सुरू असल्याने पाणी व अन्न मिळत नसल्याने या दिवसात चिमणी, कावळा व इतर पक्ष्यांची परवड होते. तीव्र तापमानामुळे अनेकदा पक्षी मृत्यूमुखी पडतात. पक्ष्यांचा उन्हाळा सुखकर व्हावा, या उद्देशाने येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी जुनी सांगवी परिसरातील झाडांवर फायबर घरटी टांगून त्यात अन्नधान्य व पाण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर भटक्या प्राण्यांसाठी येथील पी.डब्ल्यू.डी.मैदान, शितोळेनगर येथे मोठ्या कुंड्यांमधून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
नवी सांगवी, पिंपळे गुरव, जुनी सांगवी भागातील काही झाडांवर ही फायबर घरटी लावण्यात आली असून उन्हाळ्याची तीव्रता पाहता नागरिकांनीही आपल्या घर परिसरात, गच्चीवर पक्ष्यांसाठी पाणी व चाऱ्याची सोय करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम यांनी केले आहे.
या उपक्रमात वन्य पशू-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे विनायक बडदे, प्रवीण पवार, आकाश जाधव, अनिरुद्ध नाईक, जयवर्धन कांबळे, पालवी बडदे, व्यंकटेश बडदे, मयुरेश पवार, अशोक बनसोडे, जीवदया सेवा ट्रस्ट पुणे यांनी सहभाग नोंदवला.