
शितोळेनगर येथे चेंबरचे झाकण बसवले
जुनी सांगवी, ता. २३ ः येथील भूमिगत सांडपाणी आदी वाहिन्यांवरील चेंबरच्या झाकणाच्या चोरीचे सत्र सुरूच आहे. शितोळेनगर येथील रस्त्यालगत असलेल्या चेंबरचे लोखंडी झाकण गायब झाल्याने हा चेंबर धोकादायक अवस्थेत उघडा होता. यामुळे येथे अपघाताचा संभाव्य धोका होता. याबाबत स्थानिक नागरिकांकडून स्थापत्य व संबंधित विभागाला येथे झाकण बसविण्याची मागणी करण्यात आली होती. रविवारी (ता. २१)याबाबत ‘सकाळ’मधून सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. स्थापत्य विभागाकडून तत्काळ दखल घेत शितोळेनगर येथे लोखंडी झाकण बसविण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जुनी सांगवी परिसरातील अनेक झाकणे चोरीला गेलेली आहेत. गतवर्षी या प्रकाराबाबत तत्कालीन स्थापत्य अभियंत्याने सांगवी पोलिसांत याबाबत तक्रारही दाखल केली होती.
‘‘सांगवी परिसरात लोखंडी झाकणे चोरीला जाण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. सुजाण जागरूक नागरिकांनीही याबाबत लक्ष देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.’’
- सुनील दांगडे, अभियंता, स्थापत्य विभाग