
सांगवी हास्य क्लबचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
जुनी सांगवी, ता. २८ ः सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या हास्य क्लबचा वर्धापनदिन संत सावता माळी महाराज उद्यानात उत्साहात साजरा करण्यात आला. सांगवीतील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित येत २७ मे २००६ रोजी हास्य क्लब सुरू केली होती. आजही क्लबचा रोजचा उपक्रम नियमितपणे चालू आहे. सांगवी पंचक्रोशीतील ज्येष्ठ प्रवचनकार बब्रुवाहन वाघ महाराज यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महेश भागवत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण भागवत यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात ज्येष्ठांच्या जीवनशैलीबाबत तसेच समाधान आणि मन:शांती या साठीच्या आचरणाची मौलिक तत्त्वे अंगीकारून ज्येष्ठांनी पुढे चालत राहावे, असे उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी श्रीपती कोंडे, गोविंदराव आडके, रामदास कामथे यांनी भावस्पर्शी अशी गाणी सादर केली. आरोही धांडे, परशुराम बिराजदार या बाल कलाकारांनी गीत गायन केले. अध्यक्षीय भाषणात वाघ महाराज यांनी व्यायामाचे महत्त्व पटवून सांगितले. याशिवाय हास्य हे आनंदी जीवनासाठी आवश्यक असल्याचे अनेक प्रसंग व उदाहरणांचे किस्से सांगत पटवून दिले. या वेळी सर्वानुमते बबनराव सोनवणे यांची हास्य क्लबचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रम यशस्वितेसाठी रामदास कामथे, डॉ. सुरेश पाटील, प्रवीण सांडभोर, भाऊसाहेब जाधव आदींनी परिश्रम घेतले.