दोन आठवडे ९६ आधार केंद्रे बंद राहणार 
उपनगरातील नागरिकांची गैरसोय, ऑपरेटर यूआयडी परीक्षेनंतर आधार केंद्र होणार सुरू

दोन आठवडे ९६ आधार केंद्रे बंद राहणार उपनगरातील नागरिकांची गैरसोय, ऑपरेटर यूआयडी परीक्षेनंतर आधार केंद्र होणार सुरू

रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी, ता. ३१ : पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहर मिळून एकूण ९६ आधार ऑपरेटर यांचे तात्पुरत्या स्वरूपात काम थांबविण्यात आल्याने शहर व उपनगरातील आधार केंद्र बंद आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेच्या काळातच शहर व उपनगरातील नागरिकांची गैरसोय होत आहे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण कार्यालय मुंबई ‘यूआयडीएआयआरओ’ कार्यालयाकडून ता. ३० पासून आधार ‘डेटा क्वॉलिटी’च्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील ९६ ऑपरेटर यांचे तात्पुरत्या स्वरूपात काम थांबविण्यात आले आहे. तसेच त्यांना त्यांच्या कामामध्ये सुधारणा करण्याचे ‘यूआयडीएआय’ यांच्या कार्यालयाने ठरवलेले आहे. या सर्व ९६ ऑपरेटर यांना ‘यूआयडी’ यांची ‘प्रॅक्टिस परीक्षा’ पुन्हा द्यावी लागणार आहे. त्याबाबतचे परीक्षेचे यूजर आयडी पासवर्ड व लिंक ऑपरेटर यांना कळविण्यात आलेले आहेत. या सर्व ९६ ऑपरेटरांना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा ‘यूआयडी’ यांच्याकडून आधार काम करण्यासाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये किमान एक दोन आठवड्याचा कालावधी लागणार आहे, असे संबंधित डेटा क्वॉलिटी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महिला बालकल्याण कार्यालय, महापालिका कार्यालय, बीएसएनएल, पोस्ट ऑफिस, बॅंक या ठिकाणी सुरू असलेल्या ठिकाणी आपली कामे करावीत असे सांगण्यात आले.
सध्या बारावी विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकाल लागल्याने पुढील उच्च शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी वय, अधिवास राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, इ. डब्ल्यू. ई. एस. प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नागरवस्ती विभागातील शैक्षणिक योजनांसाठी आधार आवश्यक असल्याने विद्यार्थी व नागरिकांची महा ई सेवा व आधार केंद्रामध्ये गर्दी पहावयास मिळत आहे.
ता. ३० पासून शहरातील आधार केंद्र बंद असल्याने पालक, नागरिक, विद्यार्थी यांची गैरसोय झाल्याचे चित्र पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवीसह शहर परिसरात पहायला मिळाले. अचानक उपनगरातील आधार केंद्र बंद राहिल्यास नागरिकांची गैरसोय होऊन, सध्या सुरू असणाऱ्या ठिकाणी गर्दी व कामाचा ताण वाढणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय थांबविण्यासाठी तपशीलवार माहिती, प्रभाग निहाय ठिकाणांची माहिती कळवावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

‘‘आधार केंद्र बंद असल्याने पालकांची गैरसोय होत आहे. इतर ठिकाणी शोधाशोध करावी लागत आहे.
- नितीन करवा, नागरिक.

‘‘आधार दुरुस्ती व अपडेटसाठी मी गेलो असता, आधार केंद्र बंद असल्याने नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत.
- चंद्रकांत हुर्सूले, नागरिक.

‘‘हे काम स्वतंत्र चालते. तांत्रिक अडचणी दुरुस्ती करून, काही दिवसांत प्रक्रिया पूर्ण होऊन यंत्रणा पूर्ववत होतील.
- वनश्री लाभशेटवार, उपजिल्हाधिकारी, पुणे.

फोटो ः 15629

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com