मैलामिश्रित पाणी थेट पवनेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैलामिश्रित पाणी थेट पवनेत
मैलामिश्रित पाणी थेट पवनेत

मैलामिश्रित पाणी थेट पवनेत

sakal_logo
By

पिंपळे गुरव, ता. १५ ः पिंपळे गुरवतील दशक्रिया घाटाजवळ भूमिगत गटार फुटल्याने मैलामिश्रित हजारो लिटर्स पाणी थेट पवना नदीपात्रात मिसळत आहे. एकीकडे नदी स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मात्र, दुसरीकडे पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे, स्थानिक रहिवासी व अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी या भागामधून पवना नदी वाहते. त्यातील पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीला लागूनच अनेक नागरी वसाहती आहेत. मलनिस्सारण्याची समस्या सोडविण्यासाठी या भागात भूमिगत गटारे बांधण्यात आली. पण, तेथे गळती होऊन त्यातील घाणेरडे पाणी थेट नदीपात्रात जात असल्याने संपूर्ण परिसर व स्मशानभूमीत दुर्गंधी पसरलेली आहे. याखेरीज, परिसरात डासांचे साम्राज्य वाढल्याने येथील रहिवाश्यामध्ये डेंगी, हिवताप यासारखे आजार होऊन येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
एकीकडे नागरिकांनी नदीचे प्रदूषण टाळावे यासाठी जनजागृती केली जात असताना दुसरीकडे गटारे फुटल्याने नदी प्रदूषण वाढत आहे. मात्र, याकडे पालिकेच्या अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप येथील स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातून अंत्यविधीसाठी अनेक नागरीक येतात. पण, घाण पाण्यामुळे येणाऱ्या दुर्गंधीमुळे नदीकिनारी उभे राहणे मुश्कील झाले आहे. शहरातील नदीकिनारी असलेल्या गटारांची पाहणी करून ती दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

‘‘पिंपळे गुरव स्मशानभूमी येथील गटाराचे (चेंबर)चे काँक्रिट निघाले आहे. त्यामुळे, मलनिस्सारण पाणी पवना नदीत मिसळत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे काम करण्यात विलंब होत आहे. दोन ते तीन दिवसांत काम पूर्ण केले जाईल.’’ किशोर महाजन, कार्यकारी अभियंता (जलनिस्सारण विभाग) ''ड'' प्रभाग

‘‘पिंपळे गुरव येथील स्मशानभूमी शेजारील गटार बऱ्याच दिवसांपूर्वी फुटले आहे. तेथील घाण पाणी पवना पात्रामध्ये मिसळत आहे. त्यामुळे, परिसरात दुर्गधी पसरली आहे. जलनिस्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची लवकर दुरुस्ती करावी.’’ - सुरेश सकट, स्थानिक रहिवासी