लिनियर गार्डनमध्ये आता टवाळखोरांचा उपद्रव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिनियर गार्डनमध्ये आता टवाळखोरांचा उपद्रव
लिनियर गार्डनमध्ये आता टवाळखोरांचा उपद्रव

लिनियर गार्डनमध्ये आता टवाळखोरांचा उपद्रव

sakal_logo
By

पिंपळे गुरव,ता.४ ः पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डनचा मद्यपींनी अगोदरच ‘ताबा’ घेतलेला असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांऐवजी प्रेमी युगुले आणि टवाळखोरांचे प्रस्थ वाढले आहे. त्यामुळे, येथे लहान-मोठ्या प्रमाणावर वाद होत आहेत. सर्वसामान्य नागरिक विशेषतः महिला आणि लहान मुलांची सुरक्षा आता ‘रामभरोसे’ राहिली आहे. त्यामुळे, तेथे सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करुन पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्चून पिंपळे सौदागर (प्रभाग क्र.४०) येथे लिनिअर गार्डन विकसित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि नागरिकांसाठी हे उद्यान तयार करण्यात आले. मात्र, पालिकेचा उद्यान विभाग आणि पोलिस खात्याच्या दुर्लक्षामुळे या उद्यानाची पुरती वाताहत झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या उद्यानाला कुणी वाली राहिला नसल्याने ते जणू काही अंतिम घटका मोजत आहे. अस्वच्छता, तुटलेली खेळणी आणि बाके, कानाकोपऱ्यात वाढलेले गवत, मोडलेल्या जाळ्या दिसून येत आहेत. त्यामुळे, उद्यानात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे, बाळ गोपाळांना येथे खेळण्यावरही मर्यादा आल्या आहेत. करदात्या नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांचा निधीचा चुराडा झाला असून याला जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मद्यपींचा अड्डा अन प्रेमी युगुलांचे चाळे
उद्यानात प्रवेश करताच डाव्या बाजूला मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येतो. पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास आदी खाद्यपदार्थांचा कचरा अस्ताव्यस्त पडलेला असल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, प्रेमीयुगुलांच्या चाळ्यांमुळे महिला आणि जेष्ठ नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.


‘‘उद्यानातील नादुरुस्त खेळणी, स्मार्ट बेंच, ब्लॉक लवकरात लवकर दुरुस्त केले जातील. येथील सुरक्षा कमी असल्याने उद्यान, वृक्ष संवर्धन व सुरक्षा विभागाशी बोलून सुरक्षेची पुरेशी व्यवस्था केली जाईल. आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार करून रोजचा रोज कचरा उचलण्याबाबतच्या समस्या त्वरित मार्गी लावू.’’ - मनोज सेठिया, सह शहर अभियंता, स्थापत्य (उद्यान/क्रीडा) विभाग


‘‘उद्यानाला सुरक्षा भिंत नसल्याने व वाढलेल्या झाडा-झुडपांमुळे येथे अनेक प्रकारचे साप, विंचू, उंदीर, घूस यांचे वास्तव्य दिसून येत आहे. उद्यानातील स्वच्छतागृह बंद असल्याने येथे फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे.’’ - संजय जाधव
स्थानिक रहिवासी


‘‘प्रेम युगलांचे चाळे या गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अक्षरशः नागरिकांना रस्त्याने जात असताना लाज वाटत आहे. स्वतःलाच मान खाली करून पुढे जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. यावर प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे.’’ - राकेश नखाते,
स्थानिक रहिवासी