दिव्यांग मुस्लिम तरुणाच्या लग्नासाठी सरसावले हिंदू कुटुंबीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग मुस्लिम तरुणाच्या 
लग्नासाठी सरसावले हिंदू कुटुंबीय
दिव्यांग मुस्लिम तरुणाच्या लग्नासाठी सरसावले हिंदू कुटुंबीय

दिव्यांग मुस्लिम तरुणाच्या लग्नासाठी सरसावले हिंदू कुटुंबीय

sakal_logo
By

पिंपळे गुरव, ता. २२ ः येथील मल्हार गार्डन येथे सामाजिक एकतेचे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळाले. दापोडीतील जन्मापासूनच दिव्यांग, मातृछत्र हरवलेला सुहेल. वडिलांचाही अचानक मृत्यू झाल्याने तो पुरता हतबल झाला. पदविका धारण केलेल्या परंतु, पैशांअभावी शिक्षण थांबलेल्या धाकट्या बहिणीसह राहत असलेल्या सुहेलसमोर समस्यांचा डोंगर आवासून उभा राहिला.

सुहेल अन्सारी या मुस्लीम युवकाचे त्याच्या सारख्याच मोसीना या युवतीशी लग्न ठरले. हालाखीची परिस्थिती असल्याने लग्नामध्ये पन्नास वर्षांपासून त्याचे शेजारी असलेले कणसे कुटुंबीय त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी त्याला धीर देत मोठ्या थाटामाटात त्याचे लग्न लावून हिंदू-मुस्लीम भाईचाऱ्याचा संदेश त्यांनी दिला.

दापोडी येथे लक्ष्मी कणसे यांच्या शेजारी अन्सारी कुटुंबीय पन्नास वर्षांपासून राहते. त्यामुळे साहजिकच दोन्ही कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध वर्षानुवर्षे राहिले. सुहेल जन्मापासूनच दिव्यांग असल्याने त्याच्यावर काही शस्त्रक्रियाही झाल्या. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे सुहेलच्या या सर्व गोष्टी कणसे कुटुंबीयांनी जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळेच कणसे यांचा चिरंजीव संजय कणसे, अजय दुधभाते आणि सागर फुगेनी पुढाकार घेत सुहेलचा लग्नाचा भार उचलला आणि लग्न थाटामाटात पार पाडले.