
कासारवाडीतील तलावाची दुरवस्था कचऱ्याचे ढीग आणि वाढलेली झुडपे, पत्रे मोडकळीस
पिंपळे गुरव, ता. २६ ः कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव २५ फूट लांब, २४ फूट रुंद आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या तलावाला प्रेक्षक गॅलरी आहे. मात्र, त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मात्र, याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून येथील तलाव परिसराची स्वच्छताही झालेली दिसत नाही. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. परिसरातील संरक्षण भिंतीच्या बाजूने लावलेले पत्रे मोडकळीस आले आहेत.
परिसरात दाट झुडपे वाढली असल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्याचा वावर वाढलेला आहे. तलावाच्या कडेला असलेल्या फरश्या फुटलेल्या आहेत.
मुख्य दरवाजाच्या बाजूला प्रेक्षकांसाठी गॅलरी आहे. परंतु कित्येक दिवसांपासून गॅलरीकडे कोणीच फिरकलेलेही दिसत नाही. गॅलरीच्या पायऱ्यांवर काटेरी झाडे वाढल्याने गॅलरीत पायऱ्याही चढून जाता येत नाही. येथील फिल्टरप्लांट रूमच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या आहे. त्यामुळे त्यातील साहित्य चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे. तलावाच्या बाजूला बसण्याच्या ठिकाणी शेड नसल्याने उन्हात ताटकळत बसावे लागते.
हा तलाव शेतजमिनीवर बांधला असल्यामुळे खचत चाललेला आहे. येथे पुरुषांच्या कपडे बदलण्यासाठी असलेल्या खोलीमध्ये हँगरसुद्धा तुटलेले असून, विद्युत बटणे नादुरुस्त अवस्थेत असल्याने एखादा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. फिल्टरप्लांट रूमचा सेंटर दरवाजा (शटर) तुटले असून, यातील उपकरणांपर्यत सहज कोणीही पोचू शकतात.
ड्रेनेजचे पाइप तुटलेला असल्यामुळे सांडपाणी परिसरात पसरते. चेंबरवर झाकण तुटलेल्या स्थितीत असल्यामुळे तेथे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आरोग्य विभागाचे कर्मचारीही येथील कचरा उचलण्यास आलेले दिसत नाहीत.
कोट
या तलावाचे मेंटेनसचे टेंडर झाले आहे. या आठवड्यात वर्कऑर्डर निघाली की लगेचच येथील जलतरण तलावाचे दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करणार आहोत.
अब्दुल हमीद मोमीन, स्थापत्य अभियंता क्रीडा
कोट
तलावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक झाडे वाढल्याने येथे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर जास्त आहे. अनेक दिवस इथे कचरा उचलला नसल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागतो
विकास साळवे,
स्थानिक नागरिक
फोटोः 00639