
आम्ही विधवा नव्हे, घराचा आधार
एकीकडे पुरोगामी महाराष्ट्रात आजही विधवांना मानहानीला सामोरे जावे लागत आहे. साड्या-कपडे-दागिने, हौस-मौज, समाजातील वावर यावर बंधने, सण-समारंभापासून दूर... अशा अनेक अवहेलना झेलाव्या लागत आहेत. हीच कुचंबणा लक्षात घेऊन कोल्हापुरातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केली आहे. याचा आदर्श महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावा, असे परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पिंपरी-चिंचवडमधील महिलांशी ‘सकाळ’ने संवाद साधला. या वेळी त्यांनी ‘आम्ही विधवा नव्हे, तर घराचा भक्कम आधार आहोत,’ असे ठाम सांगितलेच. शिवाय शासन निर्णयाचे स्वागत करत समाजाची मानसिकता बदलावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
माझी रडायची नाही, तर लढायची वेळ
आज पतीला जाऊन ११ महिने झाले. कर्ता पुरुष गेल्यानंतर काय सहन करावे लागते, याची जाणीव या काळात झाली आहे. हे ११ महिने तब्बल ११ वर्षांसारखे जगले. रोज मनाप्रमाणे वेशभूषा करणे तसेच सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणे यावर अचानक बंधने आली. कोणासोबत हसून-खेळून बोलायचं नाही. ज्या समाजात राहते, त्या समाजात खाली मान घालून रस्ता धरायचा. असं जगणं जगत असताना खरंच या बुरसटलेल्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागलं. नाहीतर, जगणं अवघड होऊन बसलं असतं. यासाठी केवळ शाब्दिक आधार देणारं आपल्याला कोणी हवं असतं. मात्र, तो आधारही समाजातून मिळत नाही. नातेवाइकांसह घरातील मंडळी सांभाळून राहण्याचा सल्ला देतात. ‘आधीसारखं तुझं आयुष्य नाही’... असं थेट सांगतात. कोणी असं म्हणत नाही की, ‘घरात सर्व सुरळीत सुरु आहे का.. दैनंदिन संसार करताना काही अडचणी तर येत नाही ना. मात्र, दु:खावर वेगळ्या प्रकारे फुंकर घालण्याचे काम समाज करतो. काल सकाळी टीव्हीवर बातमी पाहिली.
नकळत मनातून खूप आनंद झाला. आजही मी पतीच्या निधनानंतर आणि या निर्णयानंतर त्यांच्या नावाने कुंकू लावणार आहे. गळ्यात मंगळसूत्र आणि हातात बांगड्या घालणार आहे. याचा मला आनंद होत आहे. इतरवेळी पायात जोडवी नसली की, अवतीभवतीची लोकं फार विचित्र पाहतात. कधी-कधी तर मी घरातून बाहेर पडताना पायात सॉक्स घालायचे. खरंच यासारख्या प्रथांचे पालन करणं कितपत उचित आहे. अनेकजण म्हणतात, ‘तुझं प्रारब्ध तुझ्या सोबत आलं. कोणी ठरवलं माझं हे प्रारब्ध.’
माझा मोठा मुलगा जन्मत: मानसिक विकलांग आहे. तो १३ वर्षाचा आहे. दुसरा मुलगा सहावीला तर तिसरा मुलगा पाचवीला आहे. मोठ्या मुलाचाही आधार नाही. मात्र, मी खचले नाही. ‘माझी रडायची नाही, तर लढायची वेळ आहे.’ अशी समजूत मनाशी घातली. रक्ताच्या नात्यांनी साथ दिली नाही. मात्र, रक्ताचे नसलेले मदतीला धावून आले. केवळ त्यांच्या असण्याचाही मला आधार वाटतो. पतीचे निधन होण्यापूर्वी त्यांनी कित्येक वर्षांनी पावणे दोन तोळ्याचं मिनी गंठण मला केलं होतं. मंगळसूत्र गळ्यात घालण्याची हौसही झाली नव्हती तेवढ्यात ते आम्हांला सोडून गेले. मात्र, आजही ते मंगळसूत्र मी घातले की, जवळचीच मंडळी मला म्हणतात, ‘कोणाच्या नावाने घातलं हे मंगळसूत्र...’ असा टोमणा मारतात. समाजाच्या अशा मानसिकतेचा त्रास होतो.
माझं वयाच्या १८ व्या वर्षी लग्न झालं. माहेर मंचर अवसरी आणि सासर शिरूर, तुळापूर. सध्या भोसरीतील लांडगेनगरला राहते. स्वत:च घर आहे. पती स्वत:चे वाहन चालवीत. त्यावर उदरनिर्वाह होत असे. आता ते वाहन मी विकले. सध्या एका दवाखान्यात थेरपीस्ट म्हणून काम करते. मला टेलरिंग व्यवसायाची आवड आहे. ड्रेस डिझायनिंगमध्ये करिअर करायचं आहे. मुलाच्या दवाखान्यासाठी पैसे लागतात. म्हणून, धडपड करावी लागते. मात्र, पैसा कमावण्याची माझ्यात ताकद आहे. समाजाला विनंती आहे की, विधवांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार द्या.
- रेश्मा सुरेश भंडारे, वय ३४, लांडगेनगर, भोसरी
सासू-सासऱ्यांसाठी मी मुलगाच
कोरोनामध्ये पती गेले. सीएनसी ऑपरेटर होते, ते ध्येयवादी होते, त्यांनी इंजिनिअरिंग केलं होतं. ज्वेलरीचा मी व्यवसाय करत होते. मात्र, त्यानंतर तो व्यवसाय काही कारणास्तव राहिला नाही. दोन मुलं आहेत. पतीला शिक्षण घेऊन मी मोठे व्हावे असं वाटत होते. त्यामुळे, त्यांच्या निधनानंतरही मी दहावी पूर्ण केली. मला नर्सिंगमध्ये करिअर करायचं आहे.
पतीच्या निधनानंतर मानसिकता खालावली. दोन मुले व सासू सासऱ्यांची जबाबदारी पडली. सासू-सासरेही मुलाप्रमाणे जीव लावतात. त्यांनाही पाहणारे सध्या कोणी नाही. मात्र, आपण चांगलं राहिलं की, समाजाची हिम्मत डोळे वर करून पाहण्याची होत नाही. जे काही खरं असेल तो मार्ग मी स्वीकारते. लोकं काय म्हणतील याचा विचार करत नाही. मी जर अशिक्षित राहिले, तर मुलांना चांगलं शिक्षण कोण देणार.. म्हणून माझा मोठा मुलगा नववीत असूनही मी दहावीचं शिक्षण घेत आहे. पती २०२१ मध्ये गेल्यानंतर कौलारू घर बांधायचं राहून गेलं आहे. आई-वडिलांचा ही आधार आहे. कोणीही तितकीशी वाईट वागणूक देत नाही. आजूबाजूला असणारे शेजारीही मदत करतात. काहीजण बोलत राहतात. मात्र, मी दुर्लक्ष करते.
महापालिकेने कामाची गरज असणाऱ्या महिलांना केवळ प्रशिक्षण न देता व्यवसायासाठी व नोकरीसाठी सहाकार्य करणे अपेक्षित आहे. मी जशी आहे तशी राहते. घराबाहेर जास्त पडणं होतं नाही. त्यामुळे, अवहेलना झाल्या नाहीत. मात्र, माझ्या पतीला ज्याप्रमाणे आवडत होतं त्याप्रमाणे मी जगण्याचा प्रयत्न करते. मंगळसूत्र काढणे, कुंकू न लावणे तसेच जोडवी न घालणे या वाईट प्रथा बंद झाल्यानंतर आणखी चांगले वाटले. या गोष्टी एकविसाव्या शतकातही सुरु राहिल्या. याला काही प्रमाणात विलंब झाला. मात्र, या निर्णयाचे स्वागत आहे. महिलांनी खचून न जाता सतत प्रयत्नात राहून आलेल्या अडचणींवर मात करणे आवश्यक आहे.
- विशाखा समाधान बनसोडे, वय ३८, त्रिवेणीनगर