
गुन्हेवृत्त नोकरी गेल्याच्या कारणावरून तरुणाला रॉडने मारहाण
पिंपरी, ता. १९ : नोकरी गेल्याच्या कारणावरून तरुणाला रॉडने बेदम मारहाण केली. हा प्रकार हिंजवडी येथे घडला.
याप्रकरणी भगवान पाती रामसिंग (रा. साखरेवस्ती, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र श्रीशैल पुजारी (वय ३२, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व आरोपी हे एकाच कंपनीच्या कँटीनमध्ये कामाला होते. मात्र, आरोपी दहा दिवसांपासून कामाला न आल्याने कँटीन मालकाने फिर्यादी यांना आरोपीला स्टाफ रूम रिकामी करण्याबाबतचा निरोप देण्यास सांगितला. याचा राग मनात धरून आरोपी फिर्यादीच्या घरी गेला. ‘तुझ्यामुळे माझी नोकरी व राहण्याची खोली गेली’ असे म्हणत रॉडने फिर्यादीला बेदम मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
------------------
देहूरोडमध्ये एकावर कोयत्याने हल्ला
दारू पिण्यास विरोध केल्याने एकावर कोयत्याने हल्ला केला. ही घटना देहूरोड येथे घडली.
याप्रकरणी अब्बास इस्माईल शेख (रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कादीर कलीम खान (रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) राज यांच्यावर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या स्टोअर रूममध्ये आरोपींना दारू पिण्यास विरोध केला. या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. फिर्यादीच्या डोक्यात वार केला. मात्र, फिर्यादीने वार चुकवला व ते दुचाकीवरून खाली पडले. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
कपडे चोरीप्रकरणी एकाला अटक
खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या आरोपीने कपडे चोरले. हा प्रकार चिंचवड येथे घडला.
नीलेश ईश्वर सोनी (वय २६, रा. शक्तीनगर, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या त्यांच्या वाल्हेकरवाडी रोडवरील गुरुद्वारा चौक येथील दुकानात असताना आरोपी कपडे खरेदीच्या बहाण्याने दुकानात आला. २२ हजार ५०० रुपये किमतीचे ७५ नग लेडीज लेगीन चोरून नेले. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
धनादेश देत फसवणूक
----------------
बँक खात्यात रक्कम नसताना तीन लाखांचा धनादेश दिला. त्यामुळे हा धनादेश न वटल्याने ताथवडेतील वळूमाता केंद्राची फसवणूक झाली.
याप्रकरणी डॉ. हरिश्चंद्र जनार्दन अभ्यंकर प्रक्षेत्र व्यवस्थापक वळूमाता केंद्र ताथवडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप भगवान अवघडे (रा. दांडेकर पूल, सिंहगड रोड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने १५ फेब्रुवारीला २०१८ ला प्रक्षेत्रातील जळाऊ लाकूड, रिकामे बारदान व भंगार साहित्य अशी चार लाख ६४ हजार ३७३ रुपये किमतीच्या मालाची लिलाव पद्धतीने उचल केली. त्यापैकी एक लाख ६५ हजार रुपये भरणा केले. तसेच त्याच्या बँक खात्यात योग्य रक्कम नाही हे माहीत असतानाही त्याने प्रक्षेत्र वाळूमाता केंद्र ताथवडे यांच्या नावे दोन लाख ९९ हजार ३७३ रुपयांचा युनियन बँक ऑफ इंडिया, पुणे या शाखेचा धनादेश दिला. परंतु हा धनादेश वटला नसून परत आला. आरोपीने रक्कम न भरता टाळाटाळ करून केंद्राची पर्यायाने शासनाची फसवणूक केली.
चिंचवडमध्ये मुलीवर अत्याचार
चार वर्षीय मुलीवर सोळा वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीची आई कामानिमित्त घराबाहेर गेलेली असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला कामानिमित्त घराबाहेर गेल्या असताना घरात त्यांची चार वर्षीय मुलगी व मुलगा दोघेच होते. पीडित मुलीचा भाऊ घराबाहेर गेला असता, आरोपी मुलाने बालिकेवर अत्याचार केला. फिर्यादी महिला कामावरून घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------------
बावधनमध्ये एकाची ऑनलाइन फसवणूक
आयसीआयसीआय बँकेचा चेक बाउन्स झाल्याचे सांगून एकाची ६६
हजार रुपयांची केली. ही घटना बावधन येथे घडली.
याप्रकरणी अजयकुमार उमाशंकर राय (रा. पौड रोड, बावधन) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयसीआयसीआय कंपनीच्या कस्टमर केअर म्हणून बोलणाऱ्या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांना तुमचा आयसीआयसीआय बँकेचा ६८ हजार १४४ रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याबाबतचा मेसेज आला. त्यानुसार, फिर्यादी हे आयसीआयसीआय कस्टमर केअर नंबरवर फोन करून चेक बाउन्स बद्दल माहिती घेत होते. त्यावेळी आरोपीने अॅप्लीकेशन चालू करण्यास सांगितले. त्यानुसार, त्यातील प्रोसीड ओके म्हणून प्रक्रिया करा, असे सांगितले. फिर्यादी यांनी त्यानुसार कृती केली असता, त्यांच्या बँकेतील ६६ हजार १९६ रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर करून फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------------
पिंपरीत पाच लाखाची फसवणूक
एमबीबीएससाठी पिंपरीतील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने पालकाकडून पाच लाख रुपये घेतले. मात्र, एमबीबीएसला प्रवेश मिळवून न देता फसवणूक केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
सचिन कुबेर शेळके (रा. महेशनगर, पिंपरी, मूळ - हरळवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रताप लक्ष्मण वाघमारे (रा. भाग्योदयनगर , कोंढवा खुर्द) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने माझा वैद्यकीय शिक्षण कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे. माझी डी. वाय. पाटील कॉलेजमधील मॅनेजमेंटमध्ये ओळख आहे, असे सांगितले. फिर्यादी यांच्या मुलीस एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून पाच लाख रुपये रोख व धनादेशाद्वारे घेतले. सर्व कागदपत्रे स्वतःकडे घेऊन नंतर प्रवेश मिळवून न देता फसवणूक केली. आरोपीमुळे फिर्यादी यांच्या मुलीचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेले. तसेच फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------------
हिंजवडीत खंडणी उकळणारा अटकेत
व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाऱ्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार हिंजवडी येथे घडला.
अतुल उर्फ काळू साखरे (रा. हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अभय सतीश गायकवाड (रा. सोमाटणे गाव) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची हिंजवडी फेज एक येथे चायनीज सेंटरची हातगाडी आहे. मागील आठ महिन्यांपासून आरोपी साखरे याने फिर्यादीच्या हातगाडीवर येऊन त्याला व्यवसाय करू देण्यासाठी दररोज तीनशे रुपये खंडणी घेतली. त्याने फिर्यादीला चायनीजची हातगाडी बंद करण्याची व मारण्याची धमकी देऊन, जबरदस्तीने तीनशे रुपयांची मागणी केली. तसेच तेथील इतर सर्व हातगाड्यांवरूनही साखरे याने दररोज खंडणी घेतली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------------