
शिवसैनिकांनी निवडणुकीसाठी कामाला लागावे चिंचवडमधील आढावा बैठकीत सचिन अहीर यांचे आवाहन
पिंपरी, ता. १९ : शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी अन् भूमीपुत्रांसाठी लढत आली आहे. त्यामुळे ज्येष्ठांपासून तरूणाईपर्यंत सर्वांनाच शिवसेनेच्या भगव्याचे आकर्षण आहे. येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पिंपरी - चिंचवड महापालिकेवर फडकणार असून शिवसैनिकांनी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहीर यांनी चिंचवड येथे नुकतेच केले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात पार पडली. त्यावेळी सचिन अहीर बोलत होते. या बैठकीस शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, राज्य संघटक गोविंद घोळवे, महापालिका प्रभारी समन्वयक वैभव वाघ, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी नगरसेवक राहुल कलाटे, अमित गावडे, अनंत कोऱ्हाळे, धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.
सचिन अहीर म्हणाले की, शिवसेनेमध्ये गटप्रमुख हा पक्षाचा पाया असून, तोच स्टार प्रचारक आहे. गटप्रमुख हाच मतदार आणि उमेदवार यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. पिंपरी-चिंचवडकरांना शिवसेना पुन्हा करसवलत मिळवून देईल. त्यासाठी मुख्यमंत्री, नगरविकास मंत्र्यांकडे दाद मागितली जाईल.
शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर म्हणाले की, नागरिकांची विविध कामे मार्गी लावून शिवसैनिकांना सत्तेच्या माध्यमातून अधिकाधिक ताकद दिली जाईल.
बुरखा फाडो आंदोलन करा
भाजपने पिंपरी - चिंचवड महापालिकेत सत्ता उपभोगताना भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली. खाबुगिरीचा उच्चांक गाठत इतिहास रचला. चवलीपावलीच्या कामांपासून ते करोडो रुपयांच्या निविदांमध्ये गोलमाल केला. केवळ ‘श्रीमंत’ महापालिकेतच नव्हे तर स्मार्ट सिटी प्रकल्पातही भाजपने ३०० - ४०० कोटींचा गफला केल्याचे वर्तमानपत्रात वाचले आहे. नैतिकतेचा आव आणणाऱ्या भाजपच्या भ्रष्टाचाराचा बुरखा शिवसैनिकांनी जाहीरपणे फाडला पाहिजे. त्यासाठी शिवसेना बुरखा फाडो आंदोलन हाती घेणार असल्याची घोषणा जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहीर यांनी केली.