‘सणअग्रिम’मुळे उत्सवांचा वाढतोय गोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सणअग्रिम’मुळे उत्सवांचा वाढतोय गोडवा
‘सणअग्रिम’मुळे उत्सवांचा वाढतोय गोडवा

‘सणअग्रिम’मुळे उत्सवांचा वाढतोय गोडवा

पिंपरी : ‘सणअग्रिम योजनेमुळे आम्हाला आगाऊ रक्कम मिळत असल्याने सण, उत्सवात आर्थित अडचण येत नाही. सणासुदीला फायदा होतो,’ हे मत आहे महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे. त्यांना दिवाळी, ईद, ख्रिसमस अशा नऊ सणांसाठी सणअग्रिम अर्थात फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स रक्कम दिली जाते. या योजनेचा सर्वाधिक लाभ दिवाळी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला कर्मचारी घेत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. गेल्या पाच वर्षात १९ हजार ४१० कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे.

महापालिका सेवेतील ज्या कर्मचाऱ्यांचे मुळ वेतन चार हजार ८०० रुपये आहे, त्यांना सणॲग्रिम दिला जात आहे. सर्वसाधारणपणे बहुतांश कर्मचारी प्रामुख्याने दिवाळीला फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स उचलतात. गेल्या काही वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही अ‍ॅडव्हान्स दिला जात आहे. तीन हजाराहून अधिक कर्मचारी या योजनेचा लाभ दरवर्षी घेतात. १० समान हप्त्यांमध्ये ही रक्कम भरावी लागते. ईद, ख्रिसमस, पारशी नववर्ष, संवत्सरी रोष होशना, बुद्ध जयंती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनानिमित्तही अग्रिम रक्कम दिली जाते. यापूर्वी साडेबारा हजार रुपये दिले जात होते. यावर्षी १५ हजार रुपये रक्कम करण्यात आली. यासाठी पाच कोटी रुपयांवर तरतूद केली आहे.

लाभार्थी ३,८९७
महापालिकेने २०१८ पासून सण अग्रीम योजना लागू केली. त्यावर्षी तीन हजार ४२५ कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. त्यांना चार कोटी २८ लाख १२ हजार ५०० रुपयांचे वितरण केले होते. त्यानंतर लाभार्थ्‍यांची संख्या वाढत गेली. यावर्षी एप्रिलअखेर तीन हजार ८९७ कर्मचाऱ्यांना पाच कोटी ८४ लाख ५५० रुपयांचे वाटप केले.

कास्ट्राईब कर्मचारी संघटनेने पाठपुरावा केल्यामुळे सणअग्रिम महापालिका कर्मचाऱ्यांना मिळू लागले. बालवाडी शिक्षिका व घंटागाडी कामगारांनासुध्दा योजनेचा लाभ मिळू लागल्याने कर्मचारी खुश आहेत.
- अविनाश इंगवले, सरचिटणीस, कास्ट्राईब कर्मचारी संघटना

सणअग्रिम मिळू लागल्याने सण साजरा करण्यास अडचण येत नाही. आगाऊ रक्कम मिळत असल्याने कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येत आहेत.
- मनोज धाईंजे, शिक्षक

उचल घेतल्याने सणाला वापरता येत आहे. १४ एप्रिल ही पगाराची तारीख नाही. मात्र, सण अग्रिममुळे जयंती महोत्सव उत्साहात साजरा करता येत आहे.
- संजय वाघमारे, घंटागाडी कर्मचारी

सणअग्रिम योजनेतून २०१८ पासून काही रक्कम आजतागायत मिळत आहे. त्याचा सणासुदीला फायदा होत आहे. ही योजना यापुढेही सुरू राहावी.
- काशिनाथ ढोले, शिपाई

वर्षनिहाय लाभार्थी व रक्कम
वर्ष / लाभार्थी / रक्कम
२०१८-१९ / ३,४२५ / ४,२८,१२,५००
२०१९-२० / ४,५६५ / ५,७०,६२,५००
२०२०-२१ / ४,१५८ / ५,१९,७५,०००
२०२१-२२ / ३,३६५ / ४,२०,७५,०००
२०२२-२३ (एप्रिलपर्यंत) / ३,८९७ / ५,८४,५५,०००

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57714 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top