पाण्यामुळे कोलडतेय सोसायट्यांचे बजेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्यामुळे कोलडतेय सोसायट्यांचे बजेट
पाण्यामुळे कोलडतेय सोसायट्यांचे बजेट

पाण्यामुळे कोलडतेय सोसायट्यांचे बजेट

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ ः ‘आमच्या सोसायटीतील बोअरला दोन-तीन महिन्यांपासून पाणी नाही. त्यामुळे रोज सहा ते सात टॅंकर मागवावे लागत आहेत. त्यासाठी रोज साडेसहा हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागतोय. पाण्याशिवाय सोसायटीला कसे सोडणार? पाण्यासाठी पाण्यासारखाच खर्च होत आहे.’ ‘महापालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. नळाला पाणी येत नाही, त्या दिवशी तीन टँकर पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे आमचे आर्थिक बजेट कोलमडलंय,’ या प्रतिक्रिया आहेत, शहरातील सोसायटीधारकांच्या. टॅंकरशिवाय सोसायट्यांची पाण्याची गरज भागत नाही, अशीच स्थिती आहे.
उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून महापालिकेतर्फे दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नळाद्वारे येणारे पाणी पुरत नाही. सोसायट्यांना टॅंकरशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती आहे. ‘पाणीपुरवठा दिवसाआड होत असला तरी पुरेसा केला जात आहे,’ असा दावा महापालिकेचे अधिकारी करत आहेत. मात्र, पुरसे पाणी मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तरीही उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रोज सात टॅंकर
आमची अंजनी गाथा गृहनिर्माण सोसायटी चिखली-मोशी परिसरात आहे. २२४ सदनिका आहेत. साधारणतः १३ फेब्रुवारीपासून आम्ही टॅंकरने पाणी घेत आहोत. कारण, बोअरवेलचे पाणी आटले आहे. महापालिकेकडून दिवसाआड होणाऱ्या पाण्याचा वापर फक्त पिणे व स्वयंपाकासाठी करत आहोत. त्याच्याही वेळा ठरवल्या आहेत. त्या वेळेतच पाणी सोडले जाते. मात्र, वापरासाठी रोज सहा ते सात टॅंकर बोलवावे लागतात. एक टॅंकर १२ हजार लिटरला आहे. म्हणजेच ८४ हजार लिटर पाणी रोज विकत घ्यावे लागते. नऊशे रुपये टॅंकरप्रमाणे दिवसाला सहा हजार तीनशे रुपये खर्च करावे लागत आहेत. पावसाळ्यात भुगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने बोअरवेलला पाणी असते, त्यामुळे सोय होते. वापरण्याचे व पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टाकीची व्यवस्था आम्ही केली आहे, असे अंजनीगाथा सोसायटीचे चेअरमन संदीप बोरसे यांनी सांगितले.

व्यथा सोसायटीची....
२५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रायोगिक तत्वावर एक दिवसाआड पाणी हा उपक्रम चालू झाला. आता त्यास अडीच वर्षे होऊ घातली, पण अजूनही पालिकेचे प्रयोग चालूच आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला असे म्हणून पालिका स्वत:ची पाठ थोपटून घेत असेल तर ते अयोग्य आहे. कारण हे प्रयोग सुरू झाले नंतर लवकरच कोरोना सुरू झाला. त्यामुळे सोसायट्यामधील ४० टक्के जनता वर्क फ्रॉम होम सवलत असल्याने आपापल्या गावी निघून गेली. त्यांच्यावर अवलंबून असलेला घरकाम करणारा स्टाफ (विशेषतः स्त्री वर्ग) सुद्धा गावी गेला. त्यामुळे लोकसंख्येत तात्पुरती घट झाली. पर्यायाने पाणी वापर कमी झाला. शिवाय पाऊसकाळ चांगला झाल्याने बोअरवेलनादेखील गेल्या आठवड्यापर्यंत बऱ्यापैकी पाणी होते. यामुळे पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर वाटत नव्हती. पण आता बरीच मंडळी परत आली आहेत. उन्हाळा असल्याने बोअर आटत आहेत. पाण्याची मागणी वाढली आहे. ती पालिकेकडून पूर्ण होत नसल्याने टँकरवर अवलंबून राहाणे भाग आहे. त्यामुळे सोसायट्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. व्यवस्थापन आणि सोसायटी रहिवासी यांच्यात वाद होत आहेत, स्वास्थ्य बिघडत आहे. जो दिवस पाणी येण्याचा नाही, त्या दिवशी आमच्या निसर्ग पूजा सोसायटीत तीन टँकर पाणी घ्यावे लागते. पुणे शहरात ४० टक्के पाणी गळती होते, म्हणून महाराष्ट्र जल प्राधिकरणाने तीव्र नाराजी दर्शवली असून ही गळती त्वरित थांबविण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या पिंपरी-चिंचवडमध्ये परिस्थिती मुळीच वेगळी नाही. ते जात्यात तर आम्ही सुपात एवढेच. खरे पाहू जाता ही खरोखरीच गळती आहे की गळतीच्या नावाखाली इतरत्र पाणी वळते केले जाते, याचा गांभीर्याने शोध घेणे आवश्यक आहे. शहरासाठी ४८० एमएलडी पाणी मिळते. १०० एसएलडी मिळविले तरी ५८० एमएलडी होईल. त्यातील ४० टक्के गळती आणि १० टक्के बाष्पीभवनाचे धरले तर ५० टक्के वजा करावे लागेल. म्हणजेच २९० एसएलडी शिल्लक राहाते. शहराची २०११ ची १७ लाख लोकसंख्या आणि त्यात गेल्या १० वर्षातील १० लाख वाढीव संख्या धरली, तरी २७ लाख जनता होते. थोडक्यात काय तर २८० एसएलडी पाण्याला २७ लाख लोकसंख्येने भागल्यास दरडोई १०३ लिटर पाणी मिळायला हवे. पण इतकेही पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. वरील सर्व बाबी जून २०२० मध्येच प्रशासनास पिंपरी-चिंचवड हाउंसिंग फेडरेशनने निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्याचा पाठपुरावाही केला होता. पण, त्यात यत्किंचितही बदल दिसून येत नाही. कुणास ठाऊक कधी विझणार ही जळत्या पाण्याची आग?
- ए. एम. देशमुख, ज्येष्ठ नागरिक, निसर्ग पूजा सोसायटी, मानकर चौक, वाकड

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57969 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top