आयटीमध्ये नोकऱ्या स्विचचा बूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटीमध्ये नोकऱ्या स्विचचा बूम
आयटीमध्ये नोकऱ्या स्विचचा बूम

आयटीमध्ये नोकऱ्या स्विचचा बूम

sakal_logo
By

सुवर्णा गवारे-नवले
पिंपरी, ता. ३ : कोरोना व लॉकडाउन काळामध्ये आयटीयन्सची वाताहत पहावयास मिळाली. दोन वर्षाच्या खडतर काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तरुण वर्गाची मानसिक कोंडी झाली. मात्र, आता हा बिकट कालावधी संपत आला आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीत आयटीमध्ये नव्या प्रोजेक्टची डिमांड वाढल्याने बिझनेस बूम झाला आहे. शेकडो प्रोजेक्ट मार्केटमध्ये एकाचवेळी आल्याने आयटीयन्सची डिमांड मागील वीस वर्षाच्या तुलनेत प्रचंड वेगाने वाढली आहे. सॉफ्टवेअर स्किल प्राप्त फ्रेशर्सलाही सोन्याचे दिवस आले आहेत.

सध्या बड्या आयटी कंपन्यांमध्ये लाखोंच्या घरात पॅकेजची खैरात सुरु आहे. अनुभवी मंडळी जुन्या कंपन्या बदलून नव्या कंपनीत लाखोंची उड्डाणे घेत आहेत. सध्या माहिती तंत्रज्ञानमध्ये (आयटी) आरोग्य क्षेत्रासहीत शेकडो अपग्रेडेड प्रोजेक्टची डिमांड ४० टक्क्यांनी वाढली आहे. परिणामी, आयटी क्षेत्रात तरुणांच्या नोकऱ्या स्वीच करण्याचे प्रमाण ३८ टक्के एवढे वाढल्याचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. हिंजवडी, मगरपट्टा, तळवडे, कोरेगावपार्क, खराडी, बाणेर याभागातील बड्या आयटी कंपन्यांमध्ये स्किल मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात आहे. नुकतेच इन्फोसिस सारख्या कंपनीने दहा हजार मनुष्यबळ लागणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याकरिता, या कंपन्यांनी मनुष्यबळ भरतीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. दूसरीकडे, मनुष्यबळ टिकविण्यासाठी विविध कंपन्यांची धडपड सुरु आहे. त्यामुळे, आयटीयन्सला देण्यात येणाऱ्या ऑफर्स, गलेलठ्ठ पगार, मेडीकल व प्रवाशी भत्त्यासारख्या सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे.

बऱ्याच आयटी कंपन्यांचे अद्यापही वर्क फ्रॉम होम सुरु आहे. त्यामुळे, प्रत्यक्षरीत्या कंपन्यांना मनुष्यबळाचे मूल्यमापन करता येणे अवघड झाले आहे. परिणामी, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांनी रुजू होण्याचा अट्टाहास सुरु आहे. बऱ्याच कंपन्यांनी बिझनेस बूम झाल्यानंतर विविध जिल्हे व राज्यांमधून मिळेल तसे आयटीयन्सला वर्क फ्रॉम होमच्या माध्यमांतून कामावर रुजू करुन घेतले आहे. मात्र, कोरोना काळानंतर सहा ते आठ महिन्याच्या कालावधीत त्यांना दूर अंतरावरुन कामांवर रुजू होणे अवघड झाले आहे. त्यामुळे, निवाऱ्यापासून प्रत्येक बाबींची शोधाशोध करण्याच्या अडचणी भेडसावू लागल्या आहेत. उदा : एका टीममध्ये ५० ते ६० जण कर्मचारी काम करत असतील तर, त्यातील तब्बल ४० च्यावर कर्मचारी याच कारणांमुळे नोकऱ्या सोडत असल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे, बड्या कंपन्या प्रोजेक्ट ब्रेक होवू नये, यासाठी बॅकअप टीम शोधू लागल्या आहेत. ऐनवेळी तज्ज्ञ कर्मचारी काम सोडत असल्याने कमी पगारावरील फ्रेशर्स किंवा कमीत-कमी अनुभवी आयटीयन्सची नियुक्ती करण्याचा फंडा प्रोजेक्टसाठी वापरला जात आहे. तसेच, सर्व सॉफ्टवेअर भाषांमधील काम प्रत्येक कर्मचाऱ्याला शिकवले जात आहे. अशा विविध क्लृप्त्या सध्या बड्या कंपन्यांमध्ये वापरल्या जात आहेत. २००५ पूर्वी आयटीमधील नोकऱ्यांमध्ये बदल करण्याच्या मानसिकतेचे प्रमाण हे १० टक्के होते. त्यानंतर, ते १० ते १२ टक्क्यांवर आले. मात्र, कोरोना काळात हे प्रमाण ३८ टक्क्यांवर गेले. त्यामुळे, हा सर्वाधिक मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे.
---
कामांमध्ये प्रामुख्याने हे झाले बदल
दिवसभरात अवेळी लॉगिन
कामांचे तास कमी-जास्त
एकाचवेळी चार ते पाच कंपन्यांमध्ये काम सुरु ठेवण्याची शक्कल
रिव्हयू टाइमला अधिक वेळ
कॅम्पस हायरिंग वाढले
नॉन आयटी जसे : बीएससी व एमएससीचा आयटीत शिरकाव
--
या स्किल्ड आयटीयन्सना डिमांड
वेब डेव्हलपमेंट, मोबाइल, पायथॉन, टेस्टिंग या सॉफ्टवेअर भाषांमधील तज्ज्ञ मनुष्यबळ
---
यामुळे वाढताहेत गलेलठ्ठ पगार
कोरोना काळात आयटीयन्सच्या हातातील नोकऱ्या गेल्या. चांगले
पॅकेजही गेले. मात्र, तिपटीने त्याच संधी आता उपलब्ध झाल्या. लॉकडाउन काळात कंपन्यांचे जे प्रोजेक्ट अडकून पडले. त्यामध्ये, अधिक कल्पकतेची भर पडून ते बाजारात आले. त्यामध्ये, मेडीकल प्रोजेक्ट ४० टक्के आले आहेत. त्यामुळे, विमा कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्वाधिक बिझनेस मार्केटमध्ये उतरविला आहे. त्यामुळे त्यांनी सर्वाधिक डिजिटल आणि सॉफ्टवेअर फंड्यांचा वापर केला आहे. सर्व्हर बेस्ड क्लाउड, जावा या मेनफ्रेमची डिमांड अधिक क्षमतेने वाढली आहे. परिणामी, बॅकींग, फायनान्स, विमा या क्षेत्रातील ग्रोथ फॅक्टर बिझनेस सर्वाधिक पटीने वाढला आहे. परिणामी, मेडीकलमधील विविध प्रोजेक्टमध्ये नव्याने काम करण्याची संधी आयटीयन्सला मिळाली आहे. त्यामुळे, तरुणांच्या पॅकेजमध्ये तब्बल १५० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसत आहे.
--
कोरोना काळानंतर तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज अधिक आहे. कंपन्यांना नवीन अडचणीला सामोरे जावे लागत आहे. वर्क फ्रॉम होममधून सर्वांना कामावर बोलावले जात आहे. परंतु, दिवसभरातील वाहतूक कोंडी, बदलता आहार आणि कुटुंबाला वेळ देता येत आहे. त्यामुळे, त्यांना कामाच्या ठिकाणी रुजू होणे अवघड झाले आहे. मोठ्या व लहान कंपन्या देखील विविध ऑफर्स कर्मचाऱ्यांना देत आहेत. परिणामी, नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, कंपन्यांनी चांगला पगार देवूनही कर्मचाऱ्यांना टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.
- भालचंद्र बलशेटवार, आयटीयन्स, खराडीपार्क
---
गलेलठ्ठ पगार आणि लाखो रुपयांचे पॅकेज मिळाले. तरीही, जबाबदाऱ्या आणि ताणतणावही तितकाच वाढत आहे. माझ्या १६ वर्षाच्या आयटीतील करिअरमध्ये मी पहिल्यांदाच नोकरी आणि पगारातील एवढा मोठा बदल अनुभवत आहे. प्रत्येक कंपनी आपआपल्या कर्मचाऱ्याला कामावर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
- गिरीराज उम्रीकर, आयटीयन्स, तळवडे
---
आकडे बोलतात :
बड्या कंपन्या : सुमारे ५ हजार
आयटीयन्स : तीन ते साडेतीन लाख
फ्रेशर्सचे पॅकेज : तीन ते दहा लाख
अनुभवींचे पॅकेज : १० ते ५० लाख
पुणे जिल्ह्यात महिन्याकाठी फ्रेशर्स डिमांड : २५ ते ४० हजार

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59583 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top