
छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमाला
पिंपरी, ता. ३ ः ‘‘मनाचा भाव म्हणजे समरसता होय,’’ असे प्रतिपादन प्रा. सुधीर गाडे यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे निगडी-प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात आयोजित छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेत ‘आचरू या समरसता!’ विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना प्रा. गाडे बोलत होते. जनसेवा सहकारी बँकेचे विलास लांडगे, प्रा. दिगंबर ढोकले, मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, सचिव प्रदीप पाटील उपस्थिती होते. प्रा. गाडे म्हणाले, ‘‘हजारो वर्षांची परंपरा असलेले भारतीय तत्त्वज्ञान जगात सर्वात उन्नत मानले गेले आहे; कारण माणूस हा परमेश्वराचा अंश आहे, असे हे तत्त्वज्ञान मानते. असे असूनही जन्माच्या आधारावर भारतात उच्च, नीचता ठरवली जाते. याबाबत शास्त्रापेक्षाही रूढी बलवान ठरल्या आहेत. या विकृतीमुळे... ‘उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन...’ अशी आर्त आळवणी संतांनी केली.’’ सर्व समाज एक आहे, या विचारातून बंधुभाव निर्माण होईल. त्याचप्रमाणे आर्थिक स्वावलंबनातून हा प्रश्न अधिक सुकर होईल. सामाजिक उद्रेक वाढावा यासाठी काही खलप्रवृत्ती कार्यरत आहेत, त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
मंडळाच्या महिला विभाग अध्यक्ष शिल्पा बिबीकर यांनी प्रास्ताविकातून महिला विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उज्ज्वला जाधव आणि वनिता राईलकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रा. शैलजा सांगळे यांनी स्वागत केले. मैत्रेयी पेठे यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा कदम यांनी आभार मानले.
--
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59588 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..