
‘अनधिकृत’वर कारवाईबाबत कौतुक
पिंपरी, ता. ३ ः प्रशासन व नागरिक यांच्यात सुसंवाद घडविण्यासाठी जनसंवाद सभा; तक्रारींच्या निवारणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती; स्थायी समितीच्या माध्यमातून नागरी सुविधा व त्यासंबंधी कामकाजासाठी अधिकाऱ्यांच्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती; अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी बैठक; अनधिकृत बांधकामे, नळजोड व फ्लेक्सवर धडक कारवाई, असे महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासकांनी घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून ‘जनसंवाद सभा महापालिका निवडणुकीनंतरही सुरूच ठेवा’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिकेची पंचवार्षिक मुदत १३ मार्च रोजी संपली आहे. ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि राज्य निवडणूक आयोगाचे राज्य सरकारने स्वतःकडे घेतलेले अधिकार यामुळे निवडणूक पुढे ढकलल्या गेली आहे. त्यामुळे सरकारने महापालिकेवर आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती केली आहे. १४ मार्चपासून त्यांनी कारभार हाती घेतला आहे. या घटनेला सोमवारी (ता. २) पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. प्रशासक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम जनसंवाद सभेचा निर्णय घेतला. शहरातील नागरिक व महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी प्रत्येक आठवड्यात दर सोमवारी जनसंवाद सभा घेण्याचा आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. पहिली जनसंवाद सभा २१ मार्च रोजी झाली.
प्रशासकांचे निर्णय...
- सर्व क्षेत्रीय कार्यालयात दर सोमवारी जनसंवाद सभा
- अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, किऑस्क काढण्याची कारवाई तीव्र
- अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविरुद्ध कारवाई तीव्र
- पार्किंग पॉलिसी अंमलबजावणी सुरू, नो-पार्किंगमध्ये कारवाई
- अनधिकृत नळजोड तोडून नळांना लावलेल्या विद्युत मोटारी जप्त
- कामचुकार कर्मचारी, बीट व मीटर निरीक्षकांवर कारवाई
-
जनसंवाद सभेत नागरिकांच्या सूचना
- पाणीपुरवठा सुरळीत करा, पाणी बिलांच्या तक्रारी सोडवा
- रस्त्यांवरील खड्डे बुजवा, डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण करा
- रहदारीच्या रस्त्यांवर गतिरोधक व दुभाजक बसवा
- जलतरण तलाव सुरू करा, पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाइन दुरुस्ती करा
- अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, पदपथावरील अतिक्रमणे हटवा
- जनसंवाद सभा कायम सुरू ठेवा, तक्रारींची सुनावणी एकत्रित घ्या
५० दिवसांत ७ जनसंवाद सभा
सभा तारीख / सूचना संख्या
२१ मार्च / १७०
२८ मार्च / १३५
४ एप्रिल / १८१
११ एप्रिल / १३६
१८ एप्रिल / ११३
२५ एप्रिल / १२१
२ मे / ९८
एकूण / ९५४
---
पिंपळे सौदागर, जगताप डेअरी चौक, वाकड परिसरात अनेकदा झाडे तोडली जातात. त्याबाबत अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, काहीही कारवाई होत नाही. झाडांचे रक्षण करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. कोणीही येतो आणि झाडांची तोडफोड करतो. इतर विकसित देशांमध्ये अशा गोष्टींबद्दल कुणाला तक्रार करण्याची गरज पडत नाही. झाडांची काळजी घेण्यासाठी त्यांची यंत्रणाच प्रभावी असते. शहरातील झाडांची कत्तल थांबविण्यासाठी महापालिका प्रशासकांनी लक्ष द्यावे.
- तनय पटेकर, स्वयंसेवक, आंघोळीची गोळी संस्था, पिंपळे सौदागर
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59598 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..